दोन माजी सदस्यांची लक्षवेधी लढत

By Admin | Updated: October 29, 2015 00:17 IST2015-10-28T22:16:32+5:302015-10-29T00:17:48+5:30

युती-आघाडीची तरूणाईलाच पसंती : युवा मतदारांना वळविण्यावर दोन्ही बाजूंकडून भर

Two former members of the opposition are in the fray | दोन माजी सदस्यांची लक्षवेधी लढत

दोन माजी सदस्यांची लक्षवेधी लढत

वैभव साळकर -- दोडामार्ग कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी युती विरूद्ध आघाडी अशी लढत होत असून दोन्ही बाजूने तरूणाईला उमेदवारी देण्यावर भर राहिला आहेच, पण त्याचबरोबर युवा मतदारांना वळविण्यावर दोन्ही बाजूंकडून मोठा भर दिला जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत दोन माजी जिल्हा परिषद सदस्या नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत. या सदस्या युतीच्या असून त्यामध्ये रेश्मा कोरगावकर भाजपतर्फे प्रभाग १५ मधून, तर संध्या राजेश प्रसादी शिवसेना पक्षातर्फे प्रभाग ७ मधून निवडणूक लढवित आहेत.
शिवसेना-भाजप युती विरूद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी थेट लढत कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीसाठी होत आहे. जवळपास निम्म्या जागांवर दुरंगी लढत होत असली, तरी इतर ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. युती किंवा आघाडीमधील नाराजांनी एक तर मनसेसारख्या पक्षांना जवळ केले आहे, किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. या एकूण निवडणुकीत जुन्या जाणत्या प्रस्थापितांऐवजी तरूणाईला प्राधान्य मिळाले आहे. अनेक ठिकाणी नव्या दमाचा तरूण वर्ग रिंंगणात उतरला असून नवनियुक्त दोडामार्ग नगरपंचायतीत नूतन नगरसेवक म्हणून निवडून जाण्यासाठी हे तरूण उमेदवार जिवाचे रान करताना दिसत आहेत. मतदारांना आपली बाजू पटवून देत विकासाची दिशा आपल्याकडेच असून आपण मला संधी द्यावी, अशी विनंती शहरातील नाक्यानाक्यावर पहायला मिळत आहे.
दरम्यान, या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून युवा मतदारांना वळविण्यावर मोठा भर देण्यात येत आहे. एक तरूण अख्ये कुटुंब वळवू शकतो, या विचारधारेने दोन्ही आघाड्या युवा मतदारांवर भर देत आहेत. तर प्रभागा-प्रभागात उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी तरूणाईचाच मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. या तरूणाई मार्फत अंतिम टप्प्यात असणारी प्रचार यंत्राणा वेगाने राबविण्यात येत आहे. जुन्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा तरूणांच्या मागे उभे राहण्याचा सल्ला सर्वच पक्षांमार्फत देण्यात येत आहे. चारही प्रमुख पक्षांनी विविध प्रभागातून पुरूष किंवा महिलांमध्ये नव्याने राजकारणात सक्रीय झालेल्या व्यक्तींनाच जवळ केल्याने यंदाच्या निवडणूकीत विजयी होणारे नूतन नगरसेवक युवा असणार आहेत. त्यामुळे शहराच्या समस्यांचा निपटारा व विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
उमेदवारीमध्ये तरूणाईला जसे प्राधान्य मिळाले आहे, तसेच दुसरीकडे दोन माजी जिल्हा परिषद सदस्याही या निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहेत. एकेकाळी नारायण राणे यांचे खंदे समर्थक असणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी निवडून आलेल्या रेश्मा कोरगावकर या भाजपमधून निवडणूक लढवत आहेत. विविध सामाजिक संस्था, बचतगट आदींच्या माध्यमातून त्या समाजात वावरत असतात. त्यांच्यासमोर अल्का विठू ताटे यांनी काँग्रेसतर्फे आव्हान निर्माण केले आहे. अल्का ताटे या राजकारणात नवीन असल्या तरी त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकद लावल्याने प्रभाग १५ मधील ही लढत रंगतदार झाली आहे.
संध्या प्रसादी यांनीही जिल्हापरिषद सदस्या म्हणून पाच वर्षे काम केले आहे. त्या भाजप पक्षामधून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतरच्या राजकीय स्थित्यंतरात त्यांनी राणे समर्थक म्हणून काँग्रेसची वाट धरली. बरखास्त झालेल्या कसई दोडामार्ग ग्रामपंचायत निवडणुकीत पती राजेश प्रसादी व त्या स्वत: निवडून आल्या. मात्र, दोन वर्षांनतर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे विशेषत: माजी सरपंच संतोष नानचे यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करत त्यांनी अन्य तीन सदस्यासह भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांनतर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पक्ष बदलत शिवसेनेत प्रवेश केला. प्रसादी यांना पक्षाने प्रभाग क्रमांक ७ मध्ये उमेदवारी दिली आहे.या प्रभागातही युती विरूद्ध आघाडी अशी दुरंगी लढत असून काँग्रेस पक्षात उज्ज्वला भागो ताटे यांच्यारूपाने आव्हान उभे केले आहे.
रेश्मा कोरगावकर व संध्या प्रसादी या राजकारणातील अनुभवी तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असल्या तरी काँग्रेसनेही नव्या दमाच्या उमेदवारानिशी त्यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. या दोन्ही लढतीत आपलेच पारडे जड असे म्हणून युती व आघाडी मार्फत डांगोरा पिटला जात असला तरी राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते, याची भितीही सर्वांनाच भेडसावत आहे. एकंदरीत नूतन नगरसेवकांसह सत्ता मिळविण्यासाठी आघाडी आणि युतीची चांगलीच झुंज येथे पहायला मिळत आहे.

Web Title: Two former members of the opposition are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.