मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:00 IST2019-07-09T14:58:16+5:302019-07-09T15:00:49+5:30
वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज वितरणाच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे यांनी दिला आहे.

मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष
वैभववाडी : वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज वितरणाच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे यांनी दिला आहे.
याबाबत शारदा कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वादळी पावसामुळे झाड कोसळल्याने वीजेचा खांब मोडून पडल्याची माहिती ग्रामस्थांसह आपणही वीज वितरणला कळविली. त्यामुळे लागलीच वीज वितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ घटनास्थळाची पाहणी करुन गेले. परंतु, २४ तास उलटून गेले तरी मोडलेला वीजेचा खांब बदलण्यासाठी वीज वितरणकडून कोणीही वाडीत फिरकलेले नाहीत. दोन दिवस वीज नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला आहे.
एक खांब मोडून पडल्याने संपुर्ण बौद्धवाडीचा वीज पुरवठा दोन दिवस बंद असताना महावितरणच्या अधिका-यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्याच्या गावातील नैसर्गिक आपत्तीमुळे खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत वीज वितरण कंपनीकडून एवढा बेफिकीरपणा दाखवला जात असेल तर अन्य गावातील स्थिती काय असेल? याची कल्पनाच केलेली बरी, असे शारदा कांबळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
वीज पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याची खबरदारी घेऊन अधिका-यानी तातडीने कार्यवाही न केल्यास महावितरणच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शारदा कांबळे यांनी दिला आहे.