सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:35 IST2022-11-19T12:34:46+5:302022-11-19T12:35:18+5:30
संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट.

सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना
कणकवली: सिंधुदुर्गातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कसे ठेवता येईल आणि भाजपला निवडणुकीपासून कसे दूर ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पारकर व अन्य पदाधिकाऱ्यांना केली.
संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.
शिवसेनेकडून कणकवली तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. तसेच कणकवली तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ५८ ग्रामपंचायतीपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती या शिवसेनेकडे येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, विधानसभा मतदारसंघ निहाय ओरोस येथे बैठका देखील घेण्यात आली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यासर्व घडामोडींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली.