दिवाळीपूर्वीच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल!, अनेक मार्गांवर आतापासूनच वेटिंग
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 26, 2023 15:52 IST2023-10-26T15:51:58+5:302023-10-26T15:52:21+5:30
सर्वाधिक गर्दी मुंबई मार्गावर

दिवाळीपूर्वीच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल!, अनेक मार्गांवर आतापासूनच वेटिंग
सिंधुदुर्ग : दिवाळीसाठी मुंबईत तसेच सुटीत पर्यटनस्थळी जाण्यासाठी महिना अगोदर रेल्वेचे आरक्षण करण्यास प्रवासी सुरूवात करतात. तर ऐनवेळी प्रवास करण्यास निघणाऱ्या प्रवाशांना तत्काळची सेवा घ्यावी लागते. त्याचबरोबर ती मिळाली नाही तर इतर पर्यायी सेवेचा वापर करून प्रवास करावा लागतो. दिवाळीचेही तिकीट बुकिंग आतापासूनच सुरू असल्याने बहुतांश गाड्या फुल्ल झाल्या आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी आदी गाड्यांचे बुकिंग फुल्ल दाखवित आहे. तर मंगला एक्सप्रेस, मंगलोर एक्सप्रेस, कोचिवली, मंगलादीप तिरूनवेल्ली एक्सप्रेस या गाड्यांचेही तिकीट मिळणे मुश्किल झाले आहे.
एजंटांची चांदी
- तिकिट मिळणे अवघड आहे. यामुळे प्रवास करण्यासाठी कुठल्याही स्थितीत आपल्याला तिकीट मिळावे म्हणून प्रवासी एजंटाकडे धाव घेतात.
- प्रवाशांची अडचण लक्षात घेता एजंटांनी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत.
सर्वाधिक गर्दी मुंबई मार्गावर
दिवाळी तसेच सुटीच्या दिवसात मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण लवकरच फुल्ल होतात. कारण दिवाळी सण साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्हावासीय मुंबईकडे धाव घेताना आढळतात. उन्हाळी सुट्टी आणि गणेशोत्सवात चाकरमानी गावाकडे धाव घेतात. तर दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी गावकरी महानगरीला सर्वाधिक पसंती दर्शवितात.
दिवाळीचा प्रवास केवळ तत्काळ, प्रीमियम तत्काळवर
- दिवाळी सणानिमित्त सुमारे एक महिन्यापासूनच मुंबई, गुजरात, मेंगलोर, दिल्ली कडे जाणाऱ्या गाड्यांमधील आरक्षण करण्यात येते. त्यामुळे रेल्वे गाड्या लवकरच फुल्ल होतात.
- तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना दिवाळीचा प्रवास तत्काळ आणि प्रीमियम तत्काळवरच करावा लागणार आहे.