मालवणमधील पर्यटन हंगाम आता शेवटच्या टप्यात; किल्ले दर्शन, साहसी जलक्रीडा कधी बंद होणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:55 IST2025-05-16T17:54:32+5:302025-05-16T17:55:42+5:30

संदीप बोडवे मालवण: मालवण मधील पर्यटन हंगाम शेवटच्या टप्यात आहे. यामुळे येथील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. दरम्यान पर्यटन ...

Tourist season in Malvan now in its final stages Fort visits, adventure water sports to be closed | मालवणमधील पर्यटन हंगाम आता शेवटच्या टप्यात; किल्ले दर्शन, साहसी जलक्रीडा कधी बंद होणार.. वाचा

मालवणमधील पर्यटन हंगाम आता शेवटच्या टप्यात; किल्ले दर्शन, साहसी जलक्रीडा कधी बंद होणार.. वाचा

संदीप बोडवे

मालवण: मालवण मधील पर्यटन हंगाम शेवटच्या टप्यात आहे. यामुळे येथील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. दरम्यान पर्यटन हंगामाची सांगता २५ मे पासून होणार आहे. त्यामुळे येथील किल्ले दर्शन, साहसी जलक्रीडा प्रकार बंद होणार आहेत. शिवाय हवामान विभागाने यावेळी २० मे नंतर पावसाला सुरवात होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता पर्यटन हंगामात केवळ सहा सात दिवसांचा व्यवसाय पर्यटन व्यावसायिकांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पर्यटन व्यवसायाची व्याप्ती पाहता पावसाळी पर्यटनासाठी शासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. यावर्षीच्या पर्यटन हंगामाची सुरवात तर दिमाखात झाली. ऑक्टोबरपासून सुरवात झालेल्या या हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी जिल्ह्यात झाली. पर्यटकांचा ओढा हा किनारपट्टी भागाकडे असल्याने तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, दांडी, बंदर जेटी, चिवला बीच, आचरा, तळाशील बीच याकडे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे तसेच त्यांच्याकडून साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटता जात असल्याचे दिसून आले. यातून पर्यटन व्यावसायिकांचा चांगला व्यवसायही झाला. 

उन्हाळी सुट्टी उशिरा पडल्याने फटका

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातही येथे पर्यटकांचा ओघ बर्‍यापैकी होता. मात्र दहावी, बारावी परिक्षांमुळे किरकोळ पर्यटकच येथे दाखल झाले. या परिक्षा झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांकडून बाळगली जात होती. मात्र माध्यमिक शाळा एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यत सुरू राहिल्याने मे महिन्यातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी कुटुंबवत्सल पर्यटक फारच कमी प्रमाणात दाखल झाले. याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसल्याचे दिसून आले. 

पहलगाम हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अधिकारी वर्गाच्या सुट्ट्या रद्द झाल्या. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागातून येथे येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. ऐन पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांची संख्या रोडावल्याने त्याचा फटका साहसी जलक्रीडा प्रकारासह अन्य छोट्या पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. 

सलग सुट्ट्यांच्या कालावधीत गर्दी

वातावरणातील वाढती उष्णता यामुळेही पर्यटक कमी प्रमाणात येथे दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात येथील पर्यटन हंगाम हाऊसफुल असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले. मात्र यावेळी पर्यटक केवळ शुक्रवार ते रविवार या सलग सुट्टीच्या काळातच येथे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात या पर्यटकांची गर्दी होत आहे. 

निवासासाठी आगाऊ आरक्षण नाहीच

मे महिन्यातील पर्यटन हंगामात किनारपट्टी भागात पर्यटकांकडून निवासाचे आगाऊ आरक्षण केले जात होते. मात्र यावेळी अशी परिस्थिती किनारपट्टी भागात दिसून आली नाही. येथे येणारे पर्यटक केवळ साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटून, किल्ले सिंधुदुर्ग, रॉकगार्डन तसेच अन्य पर्यटन स्थळांना भेट देऊन माघारी परतत असल्याचे दिसून आले.

राजकोट येथे शिवपुतळा राहणार आकर्षण

राजकोट येथे नव्याने पुन्हा उभारण्यात आलेला ९१ फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा हा आता पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. पावसाळ्यात सागरी पर्यटन बंद असले तरी शिवपुतळा पाहण्याची संधी पर्यटकांना असणार आहे. त्यामुळे शिवपुतळा पाहण्यासाठी यावर्षी पावसाळ्यातही पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Tourist season in Malvan now in its final stages Fort visits, adventure water sports to be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.