कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : मुंबईसह कोकणातील काही समस्यांवर, विकासकामांबाबत खासदार नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार राणे यांनी मांडलेल्या विषयांना पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे तिलारी धरण परिसराला पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय कोंदण लाभणार आहे.नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी दुपारी १२:१५ वाजता भेट घेतली. तसेच कोकणच्या व मुंबईच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी दिलेल्या निवेदनात तिलारी धरण परिसरातील जैवविविधतेकडे पंतप्रधांनांचे लक्ष वेधले. या परिसराचा केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेत समावेश करण्याची मागणी केली.या वेळी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात नारायण राणे यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे. हा जिल्हा सुंदर समुद्रकिनारा, घनदाट जंगलं, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले व मंदिरांसारख्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे झालेले उद्घाटन हे आपल्या देशांतर्गत पर्यटन विकासाच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. तिलारी धरण परिसर हा २०० एकरपेक्षा जास्त शासकीय जमिनीवर पसरलेला असून, एक सर्वसमावेशक आणि पर्यावरपूरक पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी तो आदर्श आहे. ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा पुढील पायाभूत सुविधा प्रस्तावित आहेत. स्वच्छता सुविधा आणि सुशोभित हिरवीगार जागा, स्थानिक कोकणी आणि मालवणी पदार्थांना प्रोत्साहन देणारी रेस्टॉरंट्स, पर्यावरणपूरक निवास व्यवस्था, रिसॉर्टस्, होम स्टे, बांबूची कॉटेजेस्, पार्किंग आणि पर्यटक माहिती केंद्रे, निसर्ग पायवाटा, सायकलिंग मार्ग, बोटिंग, ट्रेकिंग आणि साहसी पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, पर्यावरणाचेही रक्षण होईल.
तिलारी धरण परिसराला लाभणार पर्यटनाचे 'आंतरराष्ट्रीय कोंदण'; नारायण राणेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:13 IST