सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघिणीचे दर्शन, वनविभागाकडूनही दुजोरा -video

By अनंत खं.जाधव | Updated: April 7, 2025 16:58 IST2025-04-07T16:55:49+5:302025-04-07T16:58:47+5:30

सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आंबोली या सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व स्पष्टपणे दिसून येत आहे. मध्यंतरी ...

Tiger sighted in Sindhudurg district in the Sahyadri belt, confirmed by the Forest Department | सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघिणीचे दर्शन, वनविभागाकडूनही दुजोरा -video

सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघिणीचे दर्शन, वनविभागाकडूनही दुजोरा -video

सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आंबोली या सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व स्पष्टपणे दिसून येत आहे. मध्यंतरी दाभिल येथील पांडवकालीन जलकुंडात एका वाघीणीचा मृतदेह आढळून आला असतानाच एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. दोडामार्ग परिसरात जंगलप्रेमीना दोन दिवसापूर्वीच वाघिण दिसून आली.

रस्ता ओलांडताना ही वाघिण अचानक गाडी समोर आली आणि थेट जंगलक्षेत्रात स्थिरावल्याचे या पर्यावरण प्रेमींनी सांगितले. या वाघिणीचे पर्यावरण प्रेमीनी केलेले चित्रीकरण व्हायरल होत असून उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी ही हा व्हायरल व्हिडिओ दोडामार्ग तालुक्यातील असल्याचे स्पष्ट केले आहे.

मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आंबोली ह्या सह्याद्रीच्या पट्यात वाघांचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागले आहे. या परिसरात वाघांची संख्या वाढली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी चारवर असलेली वाघांची संख्या ही आता आठवर जाऊन पोहोचली आहे. एक वर्षांपूर्वी खडपडे येथील जंगल क्षेत्रात काही ग्रामस्थांना एक वाघीण पाण्यासाठी नदी क्षेत्रात आली असल्याचे दिसून आले होते. त्याचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

वन विभागाने खडपडेतील वाघिण दिसलेले क्षेत्र संरक्षित ही केले होते. काही दिवसापुर्वी दाभिल येथील पांडवकालीन जलकुंडात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच वेळी या परिसरात वाघिणीच्या डरकाळीचा आवाज स्थानिक ग्रामस्थांना तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ऐकू येत होता. याच वाघिणीचे भ्रमण आंबोली परिसरात सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते.

त्यातच दोन दिवसापूर्वी मालवण येथील दर्शन वेंगुर्लेकर यांची यूथ बीटसची टीम नेहमी प्रमाणे पशू पक्षी प्राणी न्याहाळण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील जंगलक्षेत्रात आली होती. ही टीम दिवसभर भ्रमण करून मालवणच्या परतीच्या प्रवासात त्यांना दोडामार्ग तालुक्यातील घनदाट जंगलात त्याच्या गाडीसमोरून वाघ रस्ता ओलांडताना दिसला. सुरूवातीला काही समजले नाही पण नंतर हा वाघच असल्याचे त्यांना कळाले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे ते व्हिडिओ व्हायरल होत आहे.

याबाबत उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांना विचारले असता हे क्षेत्र आपल्याच दोडामार्ग तालुक्यातील असून या भागात वाघिणीचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही पूर्वी पासून या भागात विशेष खबरदारी घेत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

Web Title: Tiger sighted in Sindhudurg district in the Sahyadri belt, confirmed by the Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.