सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 18:23 IST2022-01-15T18:21:48+5:302022-01-15T18:23:40+5:30
त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे.

सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत किती वाघांचा संचार आहे, हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. त्यासाठी वनविभागाकडून शनिवारपासून व्याघ्र गणना करण्याचे काम सुरू करण्यात आली असून ही गणना २१ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे.
सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या माध्यमातून ठिकठिकाणी कॅमेरे ही लावण्यात आले होते, त्यात वाघाचे अस्तित्व आढळून आले होते. त्यामुळे या ठिकाणी वाघ आहे हे निश्चित झाले होते. मात्र व्याघ्र गणनामुळे त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या व्याघ्र गणनेच्या माध्यमातून आता वाघाचे अस्तित्व समोर येणार आहे. यासाठी एकूण पाच जिल्ह्यात ही गणना केली जाणार असून कोेल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी ही गणना केली जाणार आहे.
मागच्या काळात सिंधुदुर्गमधील वाघ हे गोवा व कर्नाटक हद्दीत गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघाचे अस्तित्व कमी दिसून आले होते. मात्र हे वाघ सर्वत्र फिरत असतात. वाघ एका दिवसात २५ किलोमीटरचे अंतर पार करतो. त्यामुळे व्याघ्र गणना वेळेस त्याचे अस्तित्व कुठे असेल ते अहवालानंतर स्पष्ट होणार आहे