करुळ घाटातील वाहतूक पूर्ववत ; जेसीबीच्या साहाय्याने दरडी हटविल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 22:38 IST2022-07-15T22:33:18+5:302022-07-15T22:38:32+5:30
या मार्गावरील वाहतूक रात्री ८ नंतर पूर्ववत झाली. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती.

करुळ घाटातील वाहतूक पूर्ववत ; जेसीबीच्या साहाय्याने दरडी हटविल्या
- प्रकाश काळे
वैभववाडी : करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक अडीज तास ठप्प झाली होती. संबंधित प्रशासनाने दोन जेसीबी च्या सहाय्याने दरडी बाजूला केल्या. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक रात्री ८ नंतर पूर्ववत झाली. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती.
गेले चार काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका करूळ घाट मार्गाला बसला. घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. शुक्रवारी सायंकाळी घाटात दरड कोसळली. दरडीचा मोठा ढीग रस्त्यावर आला होता. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली. घाट मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे व भुईबावडा मार्गे वळविण्यात आली. करुळ चेकपोस्टवर या घटनेची माहिती मिळताच तात्काळ संबंधित प्रशासनाला कळविण्यात आले. तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अमित यादव व पोलीस कर्मचाऱ्यांनी घाटात धाव घेतली.
मार्ग बंद झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर काही वाहने करुळ चेकपोस्ट वरुन मागे फिरविण्यात आली. फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वाहतूक वळविण्यात आली. तर गगनबावडा येथे अवजड वाहने थांबवण्यात आली होती. दरड बाजूला करण्यासाठी घाटात दोन जेसीबी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने पडलेल्या सर्व दरडी बाजूला करण्यात आल्या. त्यानंतर रात्री साडेसात नंतर वाहतूक पूर्ववत झाली.