उरलेत ते आमदार टिकावेत, म्हणूनच जयंत पाटील बोलतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 23:58 IST2023-10-19T23:57:25+5:302023-10-19T23:58:06+5:30
वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

उरलेत ते आमदार टिकावेत, म्हणूनच जयंत पाटील बोलतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
सावंतवाडी : अजित पवार गटातील कोणीही आमदार शरद पवार गटांच्या संर्पकात नाही. उलट आहेत ते आमदार टिकून राहिले पाहिजेत, यासाठीच शरद पवार गटांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अशी वक्तव्ये करत आहेत. वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
सावंतवाडी विधानसभेच्या वॉर रूमचे उद्घाटन गुरूवारी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे याच्या हस्ते पार पडले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघात नशिबात असेल, त्याला तिकिट मिळेल असेही यावेळी बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत 22 जागांची मागणी केली आहे. लोकशाहीत कोणीही मागणी करू शकतात, पण या सर्वांचा निर्णय भाजपचे केंद्रीय निवड मंडळ घेणार आहे, असे सांगत तिकिट वाटप सर्वांना विश्वासात घेणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार असे विचारले असता ज्यांच्या नशिबात असेल त्याला उमेदवारी मिळेल असे सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटांचे काही आमदार आमच्या संर्पकात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बावनकुळे यांनी ही भाषा फक्त आहेत ते आमदार टिकून राहिले पाहिजेत यासाठीच आहे. मात्र वेळ आल्यानंतर सर्वकाही कळेल असे सूचक विधान बावनकुळे यांनी केले.