गुलदार युद्धनौका एप्रिल अखेर समुद्रतळाशी स्थापित होणार, राज्याच्या पर्यटन विभागाने आव्हान स्वीकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:09 IST2025-03-24T17:08:56+5:302025-03-24T17:09:29+5:30

देशातील पहिला प्रकल्प असल्याने अधिक महत्त्व प्राप्त, कृती आराखडा बनविला

The state tourism department has accepted the challenge of installing the retired naval warship INS Guldar on the seabed of Nivati | गुलदार युद्धनौका एप्रिल अखेर समुद्रतळाशी स्थापित होणार, राज्याच्या पर्यटन विभागाने आव्हान स्वीकारले 

गुलदार युद्धनौका एप्रिल अखेर समुद्रतळाशी स्थापित होणार, राज्याच्या पर्यटन विभागाने आव्हान स्वीकारले 

संदीप बोडवे

मालवण : निवतीच्या समुद्रतळाशी नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ स्थापित करण्याचे आव्हान राज्याच्या पर्यटन विभागाने स्वीकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचे टार्गेट दिल्यानंतर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खात्याचे सचिव अतुल पाटणे यांनी गुलदारच्या प्रकल्पाचा कृती आराखडा बनविला आहे.

पर्यटन विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल अखेरपर्यंत गुलदार निवती रॉक समुद्र तळाशी स्थापित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, गुलदार प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच निवती रॉक समुद्रात पाणबुडी अवतरणार असल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शासनाकडून या प्रकल्पाचे उद्घाटन दिमाखात केले जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

दिवाळीत अवतरणार पाणबुडी  

आर्टिफिशल रीफ आणि अंडर वॉटर म्युझियमसाठी यशस्वीरित्या गुलदार युद्धनौकेला निवती समुद्र तळाशी स्थापित केल्यानंतरच पाणबुडी प्रकल्पाला हात घालण्यात येणार आहे. पावसाळ्याचा कालावधी उलटल्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या पर्यटन हंगामात सिंधुदुर्गात पाणबुडी आणली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या दिमाखात या प्रकल्पांचे लॉन्चिंग केले जाणार असल्याचेही समोर आले आहे. देशाच्या पर्यटनातील पहिलाच प्रयोग ठरणाऱ्या गुलदार आणि पाणबुडी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सिंधुदुर्गात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

सात वर्षांची  प्रतीक्षा

सात वर्षांपूर्वी सिंधुदुर्गच्या समुद्रात पर्यटनासाठी नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडवून त्याठिकाणी पाणबुडीचा पर्यटन प्रकल्प राबविण्यात यावा, यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला होता.  बदललेल्या सरकारमुळे या प्रकल्पांना स्थगिती मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी  प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घातल्यामुळे सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर का होईना ‘गुलदार आणि पाणबुडी’ ही दोन्ही प्रकल्प दृष्टिक्षेपात आले आहेत.

गुलदारसाठी एप्रिलची डेडलाइन

  • बहुचर्चित गुलदार युद्धनौका समुद्र तळाशी स्थापित करण्यासाठी पर्यटन विभागाने कंबर कसली आहे. पर्यटन सचिव अतुल पाटणे यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महत्त्वाचे प्रलंबित पर्यटन प्रकल्प हातावेगळे करण्याचा कृती आराखडा तयार केला आहे.
  • यासाठी त्यांनी एमटीडीसीसह पर्यटन विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. सिंधुदुर्गातील गुलदार प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • या प्रकल्पाला केंद्राने निधी दिला असल्याने प्रकल्प निर्धोकपणे पूर्णत्वास नेण्याकडे सरकारने विशेष लक्ष घातले आहे. पुढील पावसाळी हंगामाचा विचार करता मे महिन्यापूर्वीच गुलदार प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची डेडलाइन ठरविण्यात आली आहे.


२०० कोटींची उलाढाल, अभ्यासकांचे म्हणणे

२०२६ हे वर्ष सिंधुदुर्गच्या पर्यटन विश्वासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. गुलदार आणि पाणबुडी प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या पर्यटन क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. या प्रकल्पांमुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात १० हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे किमान २०० कोटींची उलाढाल शक्य असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.


१०० दिवसांचे टार्गेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खात्याचे सचिव अतुल पाटणे यांनी गुलदार  प्रकल्पाचा कृती आराखडा बनविला.

Web Title: The state tourism department has accepted the challenge of installing the retired naval warship INS Guldar on the seabed of Nivati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.