Ratnagiri: समुद्रातील लाटांशी आठ दिवस झुंज; वाऱ्यामुळे बोट हेलखावे खात होती, पण धीर सोडला नाही; तांडेलने कथन केला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:14 IST2025-11-03T19:14:25+5:302025-11-03T19:14:59+5:30
भरकटलेल्या नौकेवरील खलाशी घरी परतले

संग्रहित छाया
संकेत गोयथळे
गुहागर : गेली १५ वर्षे बोटीवर काम करत आहे. समुद्रात अनेक वेळा वादळाशी संपर्क आला पण वादळामुळे समुद्रात राहण्याची ही पहिलीच वेळ होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात बोट हेलखावे खात होती. पण, आम्ही कोणीही धीर सोडला नाही, एक दिवस आमचा संपर्क होईल आणि आम्ही सर्वजण सुखरूप घरी परतू, असा विश्वास होता, असे तांडेल मोहित बबन पटेकर (वय ३४) यांनी अनुभव कथन करताना सांगितले.
नावाशेवा येथील गावदेवी मरीन बोटीवर गुहागर तालुक्यातील नवानगर येथील तांडेल मोहित पटेकर यांच्यासह कुडली येथील २, धोपावेतील ३ तसेच गावडे आंबेरे व साखरतरमधील प्रत्येकी एक मच्छीमार कार्यरत होता. वादळात भरकटलेल्या बाेटीवरील मोहित पटेकर यांनी गेल्या आठ दिवसांचा अनुभव कथन केला.
त्यांनी सांगितले की, गेले पंधरा वर्षे मच्छीमारी व यामधील दहा वर्षे तांडेल म्हणून काम करत आहे. पण, समुद्रात राहण्याची ही पहिलीच वेळ होती. आम्ही २२ ऑक्टोबर राेजी करंजा येथून नेहमीप्रमाणे मच्छीमारीसाठी गेलो होतो. दोन दिवसानंतर २४ तारखेला जोरदार वादळाला सुरुवात झाली आणि संपर्क तुटला. वादळामुळे मच्छीमारी थांबवली हाेती. जोरदार वारे वाहत असल्याने बोटही हेलकावे खात होती.
काय करायचे मार्ग सापडत नव्हता, तरी आम्ही या बिकट परिस्थितीशी जुळवून घेतले. आम्ही कोणीही मच्छीमार न घाबरता या परिस्थितीचा सामना करत होतो. एक दिवस नक्की आमचा संपर्क होऊन आम्ही घरी परतणार याचा आम्हाला विश्वास होता, असे त्यांनी सांगितले.
तब्बल आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गुजरातमधील भागात असताना पहिल्यांदा नवानगर गावातील ग्रामस्थ राहुल कोळथरकर यांच्याशी संपर्क झाला व सर्वांनीच सुस्कारा सोडला. इथूनच आमच्या परतीचा प्रवास सुरू झाला, ३१ तारखेला रात्री ९ वाजता आम्ही करंजा बंदरावर उतरलो.