Sindhudurg: अखेर मोती तलावातील मगर जेरबंद, पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:02 IST2025-09-03T18:01:08+5:302025-09-03T18:02:14+5:30
वनविभागाच्या जलद कृती दलाकडून कामगिरी फत्ते

Sindhudurg: अखेर मोती तलावातील मगर जेरबंद, पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर यश
सावंतवाडी : मोती तलावातील ऑपरेशन यशस्वी झाले असून बुधवारी सकाळी मगरीला पकडण्यात वनविभागाच्या जलद कृती दलाला यश आले आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तब्बल दोन वेळा हुलकावणी देणाऱ्या मगरीला वनविभागाकडून सापळ्यात अडकवल्याचे कळताच मोती तालावाच्या काठावर नागरिकांनी गर्दी केली होती. ऑपरेशन मगर यशस्वी झाल्यानंतर कारज्यावरील अडथळा दूर होणार आहे.
मगरीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सोमवार पासून मगरीचा माग वनविभागाची टीम काढत होती. मात्र मगर वनविभागाच्या पथकाच्या हाती लागत नव्हती. पिंजरा लावून देखील ती त्यात येत नव्हती. माणसाची चाहूल लागताच ती पळ काढत होती. अखेर आज, बुधवारी जलद कृती दलाच्या टीमच्या सापळ्यात ही पाच फुटी मगर कैद झाली.
ऐन गणेशोत्सवात विसर्जनस्थळी संकट निर्माण झाले होते. त्यामुळे मगरीला पकडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेले पाच दिवस ही मगर पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. अखेर या मोहिमेला यश आले.
मगरीला वैद्यकीय तपासणीसाठी सातारा येथे नेण्यात आले आहे. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, पथक प्रमुख बबन रेडकर, प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब, राकेश अमृसकर आदी उपस्थित होते.