Sindhudurg: चौघांवर हल्ला करुन बिबट्या दडी मारून बसला, वनविभागाने जेरबंद करताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:53 IST2025-07-08T13:48:49+5:302025-07-08T13:53:16+5:30
वनविभागाला यश : मळेवाड ग्रामस्थांकडून सुटकेचा नि:श्वास; जखमींच्या प्रकृतीत सुधारणा

Sindhudurg: चौघांवर हल्ला करुन बिबट्या दडी मारून बसला, वनविभागाने जेरबंद करताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्यानंतर बिबट्या देऊळवाडी येथील नदीलगतच्या शेडमध्ये दडी मारून बसला होता. हा बिबट्या बारा तासांपासून वनविभागाच्या नजरकैदेत होता.
सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून, तो कुठल्याही प्रकारे जखमी किंवा आजारी नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिली.
रविवारी मळेवाड नजीकच्या कोंडुरे, देऊळवाडी येथे बिबट्याने वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये प्रभाकर मुळीक (६०), सूर्यकांत सावंत (६३), आनंद न्हावी (५४), पंढरी आजगावकर (५२) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा येथे उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला केलेला बिबट्या हा यातील जखमी प्रभाकर मुळीक यांच्या घरामागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता.
या बागेच्या चारही बाजूंनी पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यातून बाहेर जाणे बिबट्याला कठीण असल्याने तसा संशय व्यक्त केला होता. परंतु, रविवारी उशिरापर्यंत तो निदर्शनास आला नव्हता. वनविभागाने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची शोधमोहीम हाती घेतली. जखमी मुळीक यांच्या घरामागील बागेत वनविभागाची टीम दाखल झाली होती.
यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वनपरिमंडळातील वनकर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. शोधमोहिमेत हा बिबट्या मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटरपंपाच्या शेडमध्ये लपल्याचे निदर्शनास आले.
अशी राबविली मोहीम
वनविभागाने दोन पिंजऱ्यांच्या साह्याने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसविण्यात आला. शेडच्या पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओतून त्याला हुसकावले. यानंतर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. साधारण बारा तासांपासून ही पकडमोहीम सुरू होती.
ग्रामस्थांचा अंदाज खरा ठरला
प्रभाकर मुळीक यांच्या देऊळवाडी येथील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बिबट्या पाण्यातून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे तो याच परिसरात असणार, असे ग्रामस्थांनी सांगितले होते. तशी मोहीम वनविभागाकडून राबविण्यात आली आणि त्यात वनविभागाला यश आले.