Sindhudurg: कळणेत ओंकारची एंट्री, वन विभागाची डोकेदुखी वाढली; हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:05 IST2025-12-11T18:04:14+5:302025-12-11T18:05:25+5:30

दोन हत्तींची भेट ही धोक्याची घंटा?

The elephant Omkar which had been wreaking havoc in Goa and Sawantwadi has once again entered Dodamarg taluka | Sindhudurg: कळणेत ओंकारची एंट्री, वन विभागाची डोकेदुखी वाढली; हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत

Sindhudurg: कळणेत ओंकारची एंट्री, वन विभागाची डोकेदुखी वाढली; हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत

दोडामार्ग : मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डोंगरपाल गावातून तो कळणे परिसरात दाखल झाला. या अनपेक्षित पुनरागमनामुळे हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. एकीकडे गणेश टस्कर व दुसरीकडे ओंकार हत्ती दाखल झाल्याने वनविभागाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

अवघ्या सहा दिवसांपूर्वी तालुक्यातील बांबर्डे व घाटीवडे परिसरात गणेश टस्कर व मादी पिल्लूचे आगमन झाले. त्यांनी परिसरातील केळी, सुपारी, नारळ बागायतींचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला हे संकट घोंगावत असताना दुसऱ्या बाजूने ओंकार हत्ती तालुक्यात माघारी परतला आहे. तीन महिन्यांपूर्वी कळपापासून वेगळा झालेला हा हत्ती गोवा राज्यात दाखल झाला.

त्यानंतर लगतच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात या हत्तीने थैमान घातले. एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून म्हशीवरही हल्ला केला व तिला ठार केल्याची घटना घडली होती. याखेरीज एप्रिल महिन्यात मोर्ले गावातील एका शेतकऱ्याचा या हत्तीने पायदळी तुडवून बळी घेतला होता. त्यामुळे हा हत्ती पकडून न्यावा, अशी मागणी तालुक्यातून होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे प्रयत्नही सुरू झाले.

ओंकारला पाठवायचे कुठे?

सावंतवाडी तालुक्यात या हत्तीचा उच्छाद सुरू असताना हत्तीला पकडून वनतारात पाठविण्याची तयारीही वनविभागाने केली. मात्र, त्याला काहींनी आक्षेप घेत तो तळकट वनक्षेत्रात पाठविण्याची मागणी केली. या मागणीला तळकट पंचक्रोशीतून जबर विरोध झाला व हत्ती या परिसरात नको, अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे या हत्तीला नेमके पाठवायचे कुठे? असा यक्षप्रश्नच वनविभागासमोर उभा राहिला.

ओंकारला पिटाळताना ग्रामस्थांची धांदल !

दोडामार्ग तालुक्यातून ओंकार हत्ती निघून गेल्याने येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, बुधवारी सायंकाळच्या सुमारास या हत्तीचे डोंगरपाल मार्गे कळणे परिसरात पुनरागमन झाले. हत्ती आल्याची माहिती स्थानिकांना समजताच त्याला पिटाळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न ग्रामस्थांनी केला. मात्र, हत्ती आपल्या मस्तीत व जोशात ग्रामस्थांच्या दिशेनेच चालत येऊ लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी जिवाच्या भीतीने माघारी फिरणे पसंत केले.

दोन हत्तींची भेट ही धोक्याची घंटा?

तालुक्यात सध्या ओंकार व गणेश हत्ती असल्याने ते एकत्र आल्यास त्यांच्या द्वंद्व होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात ग्रामस्थ किंवा शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. त्यामुळे वन विभागाने आक्रमक बनलेल्या ओंकार हत्तीला पकडावे. तसेच, तालुक्यात असलेल्या गणेशसह दुसऱ्या हत्तीला पिटाळून लावावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title : सिंधुदुर्ग में ओंकार हाथी की वापसी: ग्रामीण और वन विभाग चिंतित

Web Summary : ओंकार हाथी ने दोडामार्ग में फिर प्रवेश किया, जिससे दहशत फैल गई। पहले से ही गणेश टस्कर से जूझ रहे वन विभाग के सामने चुनौतियाँ बढ़ गई हैं। ग्रामीणों ने हमलों और मौतों के बाद सुरक्षा सुनिश्चित करने के लिए कार्रवाई की मांग की।

Web Title : Onkar Elephant's Return to Sindhudurg: Villagers and Forest Department Anxious

Web Summary : Elephant Onkar re-entered Dodamarg, creating panic. Already dealing with Ganesh Tusker, the forest department faces increased challenges. Villagers demand action to prevent conflicts and ensure safety after past attacks and fatalities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.