तीन नंबरचा बावटा हटला, सागरी पर्यटन प्रश्न सुटला; किल्ले सिंधुदुर्गवरली होडी सेवा दहा दिवसांनंतर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:04 IST2025-11-03T16:04:10+5:302025-11-03T16:04:38+5:30
समुद्रातील चक्रीवादळामुळे होते ठप्प

तीन नंबरचा बावटा हटला, सागरी पर्यटन प्रश्न सुटला; किल्ले सिंधुदुर्गवरली होडी सेवा दहा दिवसांनंतर सुरू
मालवण : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व सागरी पर्यटन गेले दहा दिवस ठप्प होते. आता समुद्रातील वादळ शांत झाले असून वातावरण पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे बंदर विभागाकडून लावण्यात आलेला धोक्याचा तीन नंबर बावटा उतरविण्यात आला असून किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा व सागरी पर्यटन रविवार दोन नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. याबाबतची माहिती बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सद्य:स्थितीत हवामान चांगले असल्यामुळे गेले दहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक, वॉटर स्पोर्टस्, पॅरासिलिंग पर्यटन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती बंदर विभागाने दिली आहे.
दरवर्षी १ सप्टेंबरपासून सागरी पर्यटन हंगामाची सुरुवात होते. दिवाळी सुटी कालावधी हा पर्यटन हंगामाचा प्रमुख कालावधी मानला जातो. मात्र, समुद्रातील वादळ स्थितीमुळे हा संपूर्ण दिवाळी हंगाम सागरी पर्यटनाच्या दृष्टीने ठप्प झाला. याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायाला बसला आहे. वॉटर स्पोर्टस्, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, किल्ले प्रवासी होडी वाहतूक, यासोबतच हॉटेल व्यवसाय क्षेत्रालाही अनेक बुकिंग रद्द झालेत. या कालावधीत पर्यटकांची रेलचेल थांबल्याने मोठा आर्थिक फटका मालवणच्या पर्यटन क्षेत्रासोबत अर्थकारणाला बसला आहे. आता पुन्हा एकदा पर्यटनाची नवी सुरुवात झाली आहे.
येवा समुद्र आपलोच आसा
चक्रीवादळामुळे ऐन पर्यटन हंगाम तोट्यात गेल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटन व्यावसायिक पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. किनारपट्टीवर सागरी जलक्रीडा प्रकार, स्कुबा डायव्हिंग आणि समुद्रातील पॅरासिलिंग पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. मासेमारी बोटीसुद्धा खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी सज्ज असून बाजारात मासळीची आवक सुरू होणार आहे. पर्यटकांनी मासे आणि सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा किनारपट्टीकडे वळावे, असे आवाहन पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.