तटकरे, जाधवांचा आज कोणावर हल्लाबोल?
By Admin | Updated: October 29, 2015 00:15 IST2015-10-28T23:29:10+5:302015-10-29T00:15:11+5:30
रत्नागिरी दौरा : नगर परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची झुंज शिवसेनेशी

तटकरे, जाधवांचा आज कोणावर हल्लाबोल?
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांच्या १ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव हे रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीची खरी झूंज शिवसेनेबरोबर असल्याने हे दोन्ही नेते कोणावर हल्लाबोल करणार, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्या सायंकाळी शहरातील राजीवडा भागात होणाऱ्या प्रचार मेळाव्यात तटकरेंबरोबरच आमदार भास्कर जाधव हे प्रचाराच्या धुरळ्यात कोणाची घुसमट करणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग २ व प्रभाग ४मध्ये प्रत्येकी दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रीयेची तयारी पूर्ण झाली असून, दोन्ही प्रभागातील एकूण १३ केंद्रांवर मतदान होणार आहे. नोव्हेंबर २०१४मध्ये उपनगराध्यक्ष निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला होता. मात्र, पक्षांतरबंदी कायद्याचा भंग झाल्याने या चारही नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते.
त्यानंतर या चार जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. सेना, राष्ट्रवादी व भाजपचे प्रत्येकी ४ , मनसेचे दोन व अपक्ष एक असे एकूण १५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वी सेनेत असलेले उमेश शेट्ये यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेने उमेश शेट्ये यांना जेरीस आणण्याची एकही संधी आत्तापर्यंत सोडलेली नाही. मिलिंद कीर यांनी सातत्याने शेट्ये यांच्यावर आरोपांच्या तोफा डागल्या आहेत. त्यामुळे सेनेच्या आरोपांचे वार बोथट करण्यासाठी उद्याच्या रत्नागिरी दौऱ्यात तटकरे, जाधव कोणते जालीम औषध वापरणार, कोणत्या मुद्यांवर हल्लाबोल करणार, त्यांच्या हल्लाबोलमुळे विरोधक शिवसेनेवर त्याचा काही परिणाम होणार का? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (प्रतिनिधी)
दोन ‘उ’च्या लढाईत कोणाची बाजी?
दुुसरीकडे ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनल्याने शिवसेनेचे स्थानिक आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे असलेल्या या जागांवर शिवसेनेचा झेंडा रोवण्याची जोरदार तयारी केली आहे. ही निवडणूक सेनेचे स्थानिक आमदार उदय सामंत व राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. दोन ‘उ’च्या लढाईत कोणाला ‘उउ’ करावे लागणार व कोणाचे भाग्य फळफळणार हे सुध्दा ठरणार आहे.
भाजपचा राष्ट्रवादीला मूक पाठींबा?
राज्यसत्तेत शिवसेनेला भाजपने बरोबर घेतले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र सेनेशी काडीमोड घेण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. रत्नागिरीतही त्याचाच प्रत्यय येत असून, भाजपचा प्रचार हा अत्यंत गुप्तपणे, शांतपणे सुरू आहे. प्रचाराचा डामडौल कुठेही नाही. त्यामुळे भाजपच्या जागा आल्या नाही तरी चालेल पण सेनेचा विजय नको, अशी भूमिका भाजपकडून घेतली जात असल्याची चर्चा असून, राष्ट्रवादीसाठी ही भूमिका पूरक ठरणार असल्याचाही बोलबाला आहे.
यश नाही तर... : पक्षपातळीवर परिणाम
कोणत्याही स्थितीत या दोघांनाही निवडणुकीत यश आले नाही तर त्याचे परिणाम पक्ष पातळीवर त्यांना सोसावे लागतील. फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.