Sindhudurg: तारकर्लीचे स्कुबा डायव्हिंग केंद्र समस्यांच्या गर्तेत, आधुनिक आरमार बोटही बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:19 IST2025-11-07T13:18:48+5:302025-11-07T13:19:44+5:30
एकमेव स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र

Sindhudurg: तारकर्लीचे स्कुबा डायव्हिंग केंद्र समस्यांच्या गर्तेत, आधुनिक आरमार बोटही बंद
संदीप बोडवे
मालवण : भारतातील प्रमुख असलेल्या शासनाच्या तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामधील अनेक त्रुटी समोर आल्या असून, स्कुबा डायव्हिंग केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर ओढवली आहे. विशेष म्हणजे मागील दीड वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असलेल्या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामधील अत्याधुनिक ‘आरमार’ बोटही आता बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुख्य म्हणजे याचा थेट परिणाम देश - विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारे डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग आणि स्कुबा प्रशिक्षणाला बसला आहे. गत वर्षी डायव्हिंग पुलाला गळती लागल्यामुळे स्कुबा डायव्हिंग केंद्र बंद ठेवण्यात आले होते.
एकमेव स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र
तारकर्ली (ता. मालवण) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटीक स्पोर्ट्स (इसदा) हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एकमेव स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात ओपन वॉटर, ॲडव्हान्स ओपन वॉटर, इमर्जन्सी फर्स्ट रेस्पॉडर, रेस्क्यू डायव्हर, डाइव्हमास्टर व अन्य कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते.
दीड वर्ष समस्यांच्या गर्तेत...
मे २०२४ नंतर स्कुबा डायव्हिंग बंद झाल्या वर आतापर्यंत तब्बल दीड वर्ष तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र समस्यांच्या गर्तेत आहे. गेल्या वर्षी खासगी हॉटेलचा छोटा स्वीमिंग पूल भाड्याने घेऊन स्कुबा डायव्हिंगचा कारभार हाकला गेला होता. भारतातील एकमेव सुसज्ज स्कुबा डायव्हिंग केंद्र म्हणून मिरविणाऱ्या एमटीडीसीसाठी ही बाब निश्चितच भूषणावह नसल्याचे बोलले जाते.
पूल दुरुस्त झाला; पण स्कुबाचे साहित्य नाही...
जग प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्पॉट असलेल्या निवती रॉक्सजवळील समुद्रात एमटीडीसीमार्फत होणारे डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग प्रसिद्ध आहे. या अनुभवासाठी साधारण ५,९०० रुपये शुल्क आकारले जाते. पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात उतरविण्यापूर्वी इसदामधील या डायव्हिंग पुलात स्कुबाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठीची तयारी करवून घेतली जाते. पुलाच्या दुरुस्तीच्या काम मार्गी लागले आहे. मात्र डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग आणि स्कुबा प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य उदा. मुखवटे, ऑक्सिजन सिलेंडरचे रेग्युलेटर, पाण्यातील विशेष पोशाख व अन्य साहित्य खराब झाले असून नवीन साहित्य नसल्यामुळे स्कुबा डायविंग केंद्रातील उपक्रम अनिश्चित काळासाठी बंद राहिले आहेत.
इसदा मधील स्कुबा प्रशिक्षण पूल लवकरच चालु करण्यात येईल. स्कुबा डायव्हिंगची उपकरणे खरेदीला मंजुरी मिळाली आहे. ती सुद्धा लवकरच प्राप्त होतील. आरमार ही बोट अत्याधुनिक असल्यामुळे त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञ आणि बोटीचे काही नादुरूस्त पार्ट भारतात मिळत नसल्यामुळे बोट दुरूस्तीला विलंब होत आहे. - दीपक माने, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ