Sindhudurg: कुणकेश्वरमधील नव्या जागेचा सर्व्हे थंडावला, विरोधानंतर पर्यटन विभागाचा सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:26 IST2025-04-02T14:24:23+5:302025-04-02T14:26:06+5:30
संदीप बोडवे मालवण: बहुचर्चित गुलदार प्रकल्पाची जागा बदलण्याचा घाट घातला जात असतानाच त्याला मालवण आणि आणि वेंगुर्ले मधून जोरदार ...

Sindhudurg: कुणकेश्वरमधील नव्या जागेचा सर्व्हे थंडावला, विरोधानंतर पर्यटन विभागाचा सावध पवित्रा
संदीप बोडवे
मालवण: बहुचर्चित गुलदार प्रकल्पाची जागा बदलण्याचा घाट घातला जात असतानाच त्याला मालवण आणि आणि वेंगुर्ले मधून जोरदार विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या भागातून विरोधाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटन विभागानेही आता सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.
निवती रॉक ऐवजी कुणकेश्वर समुद्रातील नव्या जागेच्या सर्व्हे बाबत महाराष्ट् मेरीटाइम बोर्ड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा कडून हालचाली सुरू झाल्या होत्या. नागरिकांच्या विरोधानंतर आता या हालचाली थंडावल्याची माहिती मिळाली आहे.
पर्यटन स्थळांचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने 'भांडवल गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (एसएएससीआय) या योजनेअंतर्गत २३ राज्यांमध्ये ४० प्रकल्पांना मंजुरी देताना एक्स आयएनएस गुलजार अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल व पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी ४६.९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
एप्रिल अखेर ऐवजी आता २० मे ची डेडलाईन?...
विजयदुर्ग बंदरात उभी असलेल्या एक्स आय एन एस गुलजार युद्धनौकेवरील समुद्री पर्यावरणाला घातक असलेले घटक काढून टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पर्यावरणाला प्रदूषणकारी घटक काढून टाकल्यानंतर संबंधित विभागाकडून या प्रकल्पाला ना हरकत परवाना मिळणार आहे. त्याचप्रमाणे समुद्रतळाशी युद्धनौका स्थापित करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे.
या कामांची व्याप्ती पाहता एप्रिल अखेर नंतर आता २० मे ची डेडलाईन निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जरी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने समुद्री हवामाना बाबत २० मे ची डेडलाईन सह निर्देश जारी केली असले तरीही १५ मे पूर्वी गुलदार प्रकल्प पूर्णत्वास नेण्यावर आमचा भर असेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले .
तर पर्यटन मंत्रालयाशी कराराचा भंग
सध्याचा एमएमबी आणि एमटीडीसी चा दृष्टिकोन हा एमटीडीसी ने तयार केलेल्या आणि केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालाशी विसंगत आहे. हा अहवाल पर्यटन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आला होता आणि त्यात निवती रॉक परिसराची निवड स्पष्टपणे नमूद आहे. कुणकेश्वर आणि १७ मीटर खोलीचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला? यासाठी कोणतीही वैज्ञानिक अभ्यास सरकारच्या कोणत्याही संस्थेने केला आहे का? एमएमबी किंवा एमटीडीसी ने ठिकाण बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाची परवानगी घेतली आहे का? जर नसेल, तर हा बदल अहवाल आणि पर्यटन मंत्रालयाशी केलेल्या कराराचा भंग ठरत नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
योग्य सन्मान राखला जावा..
पावसाळी कालावधीत इंजिन नसलेली मोठी युद्धनौका विजयदुर्ग सारख्या लहान बंदरात उभी करून ती स्थिर ठेवणे कठीण आहे. समुद्राच्या लाटांचा प्रवाह, उधाणाची परिस्थिती विचारत घेता गुलदार पावसाळ्या पूर्वी समुद्र तळाशी स्थापित करणे आवश्यक आहे. गुलदार युद्धनौका निवृत्त झाली असली तरीही तिचा निवृत्ती पश्चात योग्य सन्मान राखला जावा अशा नौदलाच्या सूचना आहेत.