शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची परवड...!
By Admin | Updated: March 23, 2015 00:45 IST2015-03-22T23:18:11+5:302015-03-23T00:45:27+5:30
तालुक्यात १४ केंद्रांवर चौथीचे १३६९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ८ केंद्रांवर सातवीचे ९८९ विद्यार्थी बसले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची परवड...!
राजापूर : पंचायत समिती शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ आणि शहरातील विश्वनाथ विद्यालयातील केंद्र संचालकांच्या गलथान कारभाराचा फटका रविवारी या केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांना बसला. या परीक्षा केंद्रावर निम्म्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बेंचवर, तर उर्वरित विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जमिनीवर करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.याप्रकरणी पंचायत समिती सदस्या व माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी व शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पंचायत समितीच्या मासिक बैठकीतही या प्रश्नी शिक्षण विभागाला आम्ही जाब विचारू, असेही लाड यांनी यावेळी सांगितले.रविवारी, २२ मार्च रोजी राज्यात सर्वत्र चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. राजापूर तालुक्यात १४ केंद्रांवर चौथीचे १३६९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ८ केंद्रांवर सातवीचे ९८९ विद्यार्थी बसले आहेत. शहरातील विश्वनाथ विद्यालयात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचे केंद्र असून, या ठिकाणी एकूण १८८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुयोग्य बैठक व्यवस्थेबाबत कोणतेच नियोजन करण्यात आले नव्हते. ऐनवेळी यातील निम्मे विद्यार्थी बेंचवर, तर निम्मे विद्यार्थी जमिनीवर बसले होते. यातील आठ ते दहा विद्यार्थ्यांना विश्वनाथ विद्यालयाच्या वरील मजल्यावरील जिन्याच्या कोपऱ्यात बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या अशा बेंच व खाली जमिनीवरच्या विसंगत बैठक व्यवस्थेबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी उपस्थित गटशिक्षणाधिकारी प्रकाश ढाले, विस्तार अधिकारी संतोष सोळंकी, केंद्र संचालक रमेश धुळप यांना याचा जाब विचारला. यावेळी बेंचची संख्या अपुरी असल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर समोरील गोखले कन्याशाळेत विद्यार्थ्यांना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेथेही पुरेशा बेंच नसल्याने पुन्हा काही मुलांना खाली बसावे लागणार असल्याने व परीक्षेची वेळ जवळ आल्याने मग पालकांनीच सामंजस्याची भूमिका घेत पूर्वी होते तेथेच विद्यार्थ्यांना बसविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथे बसविण्यात आले व परीक्षा सुरळीत सुरू झाली. जिन्याच्या कोपऱ्यात बसविलेल्या त्या आठ ते दहा विद्यार्थ्यांना मात्र पालकांनी विश्वनाथ विद्यालयाच्या खालील रिकाम्या खोलीत बसविण्याची मागणी केली व ती केंद्रसंचालकांनी मान्य करत त्यांना खालील वर्गात बेंचवर बसविले. काही वर्गात तर प्रकाश व्यवस्थाही पुरेशी नसल्याने पालकांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली.
या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अगोदरच लगतच्या गोखले कन्याशाळा व राजापूर हायस्कूलच्या इमारतीत वर्ग का घेतला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बोर्डाकडून २० विद्यार्थ्यांचा एक वर्ग अशा प्रकारे या परीक्षेसाठी नियोजन केले जावे, अशी मागणीही होत आहे.(प्रतिनिधी)
विश्वनाथ विद्यालयातील केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा असो, एमटीएस परीक्षा असो वा अन्य कोणती परीक्षा असो, बैठक व्यवस्थेबाबत नेहमीच गोंधळ असतो. शिक्षण विभाग आणि केंद्र संचालक याबाबत काहीच दखल घेत नाहीत, अशी कैफियतही अनेक पालकांनी यावेळी मांडली. रविवारी होणाऱ्या या परीक्षेबाबत गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक यांनी अगोदरच योग्य नियोजन का केले नाही? असा सवाल केला जात आहे.