केसरकरांची अस्तित्वासाठी धडपड

By Admin | Updated: July 14, 2014 23:34 IST2014-07-14T23:29:37+5:302014-07-14T23:34:22+5:30

सतीश सावंत : शिवसेना प्रवेशावर केली टिकाटिप्पणी

The struggle for the existence of Kesar | केसरकरांची अस्तित्वासाठी धडपड

केसरकरांची अस्तित्वासाठी धडपड

कणकवली : मागील विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी दीपक केसरकर यांना नारायण राणे यांची मदत आवश्यक असल्याने त्यांना राणे हे वडीलभावासारखे वाटत होते. त्यावेळी राणे यांचा दहशतवाद त्यांना जाणवला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेशी नाळ तुटल्याने आपल्याला विजय मिळू शकणार नाही. हे ज्ञात झाल्याने राणे यांच्यावर विनाकारण टिका करीत आपल्या अस्तित्वासाठी केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.
येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सन २००९ मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर हे नारायण राणेंमुळेच निवडून आले. मात्र केसरकर यांच्या सवयीनुसार ते हे विसरले आहेत. बेईमानी करणे हा गुण त्यांच्यामध्ये आहे. राष्ट्रवादीने आपल्याला मंत्री करावे, यासाठी गेली पाच वर्षे त्यांची केविलवाणी धडपड सुरू होती. त्यासाठी राणे यांच्या विरोधात संघर्षाचा देखावा ते करीत होते. केसरकर यांना प्रवीण भोसले यांनी राजकारणाची वाट दाखवली. भोसले राज्यमंत्री असताना प्रवीण भोसले म्हणजे मीच असे वातावरण केसरकर यांनी तयार केले होते. नगराध्यक्ष तसेच आमदार बनविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्यांबद्दल केसरकर यांनी कृतघ्नपणाच दाखविला आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याशीही त्यांनी कृतघ्नपणा केला आहे. औरंगजेबाने आपल्या वडीलांना कैदेत ठेवून स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला होता. तसेच हे आहे. राष्ट्रवादी पक्ष सोडत असताना नारायण राणे यांच्यावर टिका केली तर आपले महाराष्ट्रात नाव होईल व उद्धव ठाकरे यांना बरे वाटेल, हा हेतू ठेवूनच त्यांचे काम सुरू आहे. मुजरे करून आपले काम करून घेणे ही त्यांची सवय असून सावंतवाडी मतदारसंघातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. सोशल मिडियाचा प्रभाव तसेच मोदी लाटेच्या परिणामामुळे केंद्रात सत्ता आल्याने राज्यातही महायुतीची सत्ता येईल, असा आभास निर्माण झाला आहे. मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीत हा भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटेल. सावंतवाडी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून तिरंगी लढतीमुळे शिवसेनेचे उमेदवार या मतदारसंघातून यापूर्वी विजयी झाले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. केसरकरांचा थंड दहशतवाद सुरू असून तो मोडीत काढला जाईल. नारायण राणे यांच्याबरोबर संघर्ष करणार असल्याचे केसरकर सांगत आहेत. मात्र राणे यांचे नेतृत्व संघर्षातूनच उभे राहिले असून त्यांच्या तोंडी संघर्ष हा शब्द शोभून दिसतो. केसरकर यांच्या विधानाला आम्ही आव्हान समजत नाही. मात्र जिल्ह्यात दहशतवादाची भाषा करून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला गेल्यास भविष्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे त्याचा मुकाबला करेल, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
---जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापतींचे स्वीय सचिव विकास पाटकर हे कॉलेज जीवनापासूनचे माझे जीवलग मित्र होते. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते. राजकीय कारकिर्दीत मी यशस्वी होण्यामागे ज्यांचे सहकार्य आहे त्यामध्ये पाटकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने वैयक्तिक हानी झाली आहे, अशी प्रतिक्रीया सतीश सावंत यांनी यावेळी दिली.

Web Title: The struggle for the existence of Kesar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.