Strict action will be taken against highway contractor: Uday Samant's warning | महामार्ग ठेकेदारावर कठोर कारवाई करणार : उदय सामंत यांचा इशारा

कणकवली येथे बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळलेल्या भागाची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, संदेश पारकर, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमहामार्ग ठेकेदारावर कठोर कारवाई करणार : उदय सामंत यांचा इशारा कणकवलीतील कोसळलेल्या बॉक्सेलच्या संरक्षक भिंतीची पाहणी, घडलेली घटना दुर्दैवी

कणकवली : कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.


कणकवलीतील बॉक्सेल संरक्षक भिंतीला भगदाड पडल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दुपारी त्याची पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलीम शेख, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारीही उपस्थित होते.


या उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संबंधित ठेकेदार व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर घटना लक्षात घेता याची चौकशी लावली जाईल. या दुर्घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


दरम्यान, महामार्गाच्या एस. एम. हायस्कूलनजीकची संरक्षक भिंत सोमवारी दुपारी कोसळल्यानंतर तातडीने या ठिकाणची वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे कणकवलीकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच वाहनांना आता कणकवली शहरातील भालचंद्र महाराज आश्रमाच्या बाजूने गेलेल्या छोट्याशा रस्त्यावरून टेंबवाडीतून बाहेर पडावे लागत आहे.


कणकवली पटवर्धन चौकातून आचरा मार्गाकडे वळून कलमठमधून गांगोमंदिराच्या शेजारी बाहेर पडणाऱ्या छोट्याशा चिंचोळ्या मार्गातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून ती वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीदम येत आहे. त्यातच बुधवारी दिवसभर पावसाची संततधार असल्याने मोठ्या प्रमाणावर चिखलही निर्माण झाला आहे.
कणकवली येथील पुलाच्या बांधकामाची भिंत कोसळणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या.


यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलिम शेख, ठेकेदार कंपनीचे गौतम, कन्सल्टंट कंपनीचे प्रतिनिधी, संदेश पारकर, संजय पडते आदी उपस्थित होते.

चाकरमान्यांबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील


कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे. चाकरमानी या सणाला दरवर्षी मोठ्या संख्येने आपल्या गावी येतात. त्यामुळे गणेशोत्सव आणि चाकरमान्यांचा प्रवास या संदर्भात मुंबईत बैठक पार पडली.या बैठकीत कोकणातील खासदार, आमदार आणि मंत्री सहभागी झाले होते. अनेक सूचना या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील. चाकरमान्यांचा क्वारंटाईनचा कालावधी हा केंद्र सरकारच्या धोरणानुसार ठरविला जातो. जे काही कोरोनाबाबत केंद्राचे धोरण असेल, त्याप्रमाणे हा निर्णय होईल, असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

कामाच्या चौकशीसाठी पोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पूर्ण चौकशी करण्यासाठी पोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करावा. जोपर्यंत महामार्गाच्या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल आॅडीट होत नाही, ठेकेदाराने नियमानुसार काम केले आहे किंवा कसे याचा संपूर्ण अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यत त्यांचे एकही बिल मंजूर करू नये. तरच ठेकेदाराला जाणीव होेईल.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामातील बेजबाबदारपणाबद्दल ठेकेदारासह सर्व जबाबदार यंत्रणा व व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

जिल्हाधिकारी यांनी यासाठी पाठपुरावा करावा. कणकवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यालय असावे.याठिकाणी ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी यांचे जबाबदार अधिकारी कायम उपस्थित असावेत. सध्या पडलेल्या भिंतीची तात्पुरती दुरुस्ती सुरू करावी. जेणेकरून सध्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला होणारा अडथळा दूर होईल.पावसाळ्यानंतर ती भिंत पूर्ण काढण्यात यावी. ज्याठिकाणी सध्या भराव आहे त्याठिकाणी पिलरचा पूल उभारण्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने केंद्राकडे सादर करावा.

महामार्गावरील तसेच मोऱ्यांमधून योग्यरित्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी तातडीने कार्यवाही करून काम सुरू करावे. एखादा अपघात झाल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या संदर्भात दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याच्या सूचनाही सामंत यांनी यावेळी दिली.


 

Web Title: Strict action will be taken against highway contractor: Uday Samant's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.