वादळसदृश परिस्थिती; मच्छीमार नौका बंदरावर स्थिरावल्या, मत्स्य व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 14:29 IST2021-12-01T14:26:54+5:302021-12-01T14:29:41+5:30
बदलत्या वातावरणाचा परिणाम आंब्याबरोबरच मत्स्य व्यावसायिकांनादेखील होत आहे.

वादळसदृश परिस्थिती; मच्छीमार नौका बंदरावर स्थिरावल्या, मत्स्य व्यवसाय अडचणीत
देवगड : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा व वारंवार पाऊस, वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने याचा विपरीत परिणाम सागरी मच्छीमारी व्यवसायावर होत आहे. गेले दोन दिवस समुद्र खवळलेला असून, हवामान विभागाच्या दक्षतेच्या सूचनेमुळे अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रकिनारीच उभ्या करून ठेवल्या आहेत.
देवगड तालुक्यामध्ये आंबा व मत्स्य व्यवसायावरती हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम आंब्याबरोबरच मत्स्य व्यावसायिकांनादेखील होत आहे. गेल्या महिनाभरामधील वादळसदृश परिस्थिती व अवकाळी पावसामुळे देवगडमधील मच्छीमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस देवगड बंदरामध्ये चांगल्या प्रकारे मच्छीमारी व्यावसायिकांना मच्छी मिळत होती. मात्र, सुरुवातीच्या मौसमामध्ये मच्छी मिळू लागल्याने मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच वादळसदृश परिस्थिती व अवकाळी पावसामुळे मासेमारी ठप्प झाली होती. गेले २० ते २५ दिवस समुद्रामधील वातावरणामुळे मासेमारी करण्यास योग्य नसल्यामुळे अनेक मच्छीमारी बांधवांनी आपल्या नौका समुद्रकिनारी उभ्या करून ठेवल्या आहेत. मासेमारी हंगामातच समुद्रातील वादळसदृश परिस्थितीचा मच्छीमारांना फटका बसत आहे.
समुद्रातील वातावरण निवळण्याची प्रतीक्षा
मासळीची उलाढाल मंदावली असून, याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. वारंवार बदलत्या वातावरणामध्ये व वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणे धोकादायक असल्याने मच्छीमार बांधवांनी मासेमारी जाण्याचे टाळले आहे. सद्य:स्थितीमध्ये समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मच्छीमार गेल्यास त्यांना मासळी मिळेल याची शाश्वती नसल्यामुळेच तोटा सहन करण्याची जोखीम पतकरण्यास मच्छीमार तयार नाहीत. येत्या काही दिवसांत समुद्रातील वातावरण निवळून मासेमारी केली जाण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. - द्विजकांत कोयंडे मच्छीमार, देवगड