दुरूस्तीच्या नावावर निकृष्ट काम, झाराप पत्रादेवी मार्गाचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:24 IST2019-01-31T18:23:33+5:302019-01-31T18:24:42+5:30
झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या नावावर निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम तेथील जागृत ग्रामस्थांनी बंद पाडले. जोपर्यंत कामाच्या दर्जा बाबत आम्हाला माहिती देत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, अशी भुमिका वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच गुणाची गावडे यांनी घेतली.

राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी साई मेठकरी, राजेभाऊ कोळी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले, यावेळी गुणाजी गावडे, जितेंद्र गावकर, गुरुदास गावकर आदी उपस्थित होते. (रुपेश हिराप )
सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या नावावर निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम तेथील जागृत ग्रामस्थांनी बंद पाडले. जोपर्यंत कामाच्या दर्जा बाबत आम्हाला माहिती देत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, अशी भुमिका वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच गुणाची गावडे यांनी घेतली.
झाराप-पत्रादेवी या चौपदरीकरण महामार्गावर डीआर कंपनीकडून डांबरीकरणाचे काम सुरू होते. ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला अशाच ठिकाणी हे काम करण्यात येत होते. वेत्ये सर्कल येते गुरूवारी सकाळी डांबरीकरण सुरू असताना हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांच्या उघडकीस आले.
डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहने गेल्यावर हे डांबर उखडू लागले. त्यामुळे वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर, गुरुदास गावकर, विजय गावकर, राजन आंबेकर, हरिश्चंद्र गावकर, मनोज पाटकर, अजय पाटकर, राजेश भैरे आदी ग्रामस्थांनी दुरुस्तीचे काम रोखले.
दरम्यान, याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी साई मेठकरी, राजेभाऊ कोळी यांना देत घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी आलेल्या या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत रस्त्याच्या निकृष्ट कामास डी. आर कंपनी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत या कामाचा दर्जा काय आहे याबाबतची माहिती मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, असे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी स्पष्ट केले.