अधिकाधिक सरपंचांसाठी राजकीय ‘फिल्डिंग’
By Admin | Updated: August 3, 2015 00:09 IST2015-08-02T23:19:58+5:302015-08-03T00:09:20+5:30
दावे-प्रतिदावे सुरुच : वैभववाडीतील १३ गावात उद्या होणार निवड

अधिकाधिक सरपंचांसाठी राजकीय ‘फिल्डिंग’
वैभववाडी : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवार ४ रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आपल्याच’ पक्षाचे जास्तीत जास्त सरपंच व्हावेत, यासाठी राजकीय पक्षांनी गावागावात फिल्डिंग लावली आहे. जिथे सरपंचपद शक्यच नाही, तिथे उपसरपंचपद मिळविण्यासाठी निरनिराळे फंडे वापरले जाऊ लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालावेळी काँग्रेस आणि भाजपने केलेले दावे कितपत खरे ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक २२ एप्रिलला झाली होती. १३ पैकी नाधवडे आणि ऐनारी या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली, तर उर्वरित भुईबावडा, मांगवली, वेंगसर, सोनाळी, कुंभवडे, एडगाव, सांगुळवाडी, खांबाळे, आचिर्णे, लोरे व कोकिसरे या गावात निवडणूक झाली होती. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस ११, तर भाजपने ६ ग्रामपंचायतींवर दावा केला होता. त्यामुळे सर्वजण संभ्रमात होते. निकालानंतर भुईबावडा, ऐनारी, सोनाळी, आचिर्णे या चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे निर्विवाद बहुमत सिद्ध झाले होते. एडगाव, मांगवली, आणि वेंगसर या तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व दिसत होते. त्याचप्रमाणे लोरेमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले. उर्वरित कुंभवडे, सांगुळवाडी, खांबाळे नाधवडे आणि कोकिसरे या ग्रामपंचायती गावविकास आघाडीच्या ताब्यात असल्याचा दावा निवडून आलेल्या पॅनलतर्फे करण्यात आला होता.
निवडणूक निकालानंतर तब्बल सव्वा तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. दरम्यानच्या काळात काही गावांमध्ये काही प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या आहेत. वेंगसरचे उपसरपंच रामदास पावसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेथे भाजपचाच सरपंच होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, भाजपच्या पॅनलमधून निवडून आलेले अनिल बेळेकर याने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वेंगसरमध्ये भाजपचे गणित बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. मांगवलीत भाजपला बहुमत असूनही उपसरपंचपद आणि लॉटरी लागलीच तर सरपंचपदही पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असल्याची जोरदार चर्चा आहे.
नाधवडेत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध झाली होती. तेथील सरपंचपद खुले असल्याने विष्णू ऊर्फ दादा पावसकर, संजय नकाशे आणि राजेश तावडे इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसचे विष्णू पावसकरच प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. भुईबावड्यात सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने माजी सरपंच श्रेया मोरे यांचीच पुन्हा वर्णी लागणार की, नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. खांबाळेत संचिता सुदर्शन गुरव आणि आचिर्णेत सविता कृष्णा बुकम यांची निवड निश्चित झाली आहे.
कोकिसरेचे सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने काँग्रेसच्या अरुणा विलास वळंजु, पूजा प्रकाश पांचाळ आणि शिवसेनेच्या सुप्रिया शंकर नारकर या इच्छुक आहेत. परंतु, ११पैकी एक सदस्य पद रिक्त असल्याने सरपंच निवडीबाबत चित्र स्पष्ट नसले तरी काँग्रेसच्या अरुणा वळंजू यांची निवड निश्चित मानली जात आहे.
तसेच लोरेमध्ये राष्ट्रवादीचे महेंद्र रावराणे यांची निवड निश्चित झाली आहे. कुंभवडे, सांगुळवाडी आणि सोनाळी येथील निवडींचे चित्र अस्पष्ट आहे. एडगांव येथे भाजपचाच सरपंच होणार हे स्पष्ट असले तरी नेमकी लॉटरी कुणाला लागणार हे सांगता येत नाही. सरपंच, उपसरपंच निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असल्याने पक्षीय पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)