Sindhudurg: सारंग कुलकर्णी यांचा तडकाफडकी राजीनामा, एमटीडीसीच्या जल पर्यटन सल्लागारपदी होते कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:53 IST2025-01-21T11:51:58+5:302025-01-21T11:53:37+5:30

बहुचर्चित पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशियल रीफ हे दोन्ही प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची भीती

Sindhudurg's father of marine tourism Dr. Sarang Kulkarni resigned from the post of Water Tourism Advisor of MTDC | Sindhudurg: सारंग कुलकर्णी यांचा तडकाफडकी राजीनामा, एमटीडीसीच्या जल पर्यटन सल्लागारपदी होते कार्यरत

Sindhudurg: सारंग कुलकर्णी यांचा तडकाफडकी राजीनामा, एमटीडीसीच्या जल पर्यटन सल्लागारपदी होते कार्यरत

संदीप बोडवे 

मालवण: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाचे जनक आणि महाराष्ट्राच्या जल पर्यटनाचे शिल्पकार असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी यांनी एमटीडीसीच्या जल पर्यटन सल्लागार पदाचा राजीनामा दिल्याने पर्यटन लॉबीत मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे डॉ. कुलकर्णी यांचा मोठा अभ्यास असलेले सिंधुदुर्गातील बहुचर्चित पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशियल रीफ हे दोन्ही प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर डॉ सारंग कुलकर्णी यांच्या तडकाफडकी राजीनाम्या मुळे महाराष्ट्राच्या पर्यटन विभागामधील अंतरंग कुरबुरी समोर आली आहे. 

नव्या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्या नंतर नोकरशाहीच्या फेरबदलात, महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय कार्यक्षमतेला अनुकूल करण्यासाठी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागात सचिव (पर्यटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटणे यांच्या नियुक्तीला आठवडा झाला नाही तोच डॉ. सारंग कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

एमटीडीसी सोबत १४ वर्षे काम..

अंदमान येथे सागरी जीव संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी याची २००६ साली एमटीडीसी सोबत स्नॉर्कलिंग प्रशिक्षक म्हणून नाळ जुळली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन पर्यटन सचिव भूषण गगराणी यांनी सिंधुदुर्ग मध्ये काम करण्यास त्यांना आमंत्रित केले होते. स्कूबा पर्यटनाचा फायदा स्थानिकांनाचा झाला पाहिजे म्हणून वेळोवेळी स्थानिकांना प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी राबविले.

पर्यटनाच्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात त्यांनी महाराष्ट्र सरकार मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे कोकणाच्या पर्यटनाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यावर काय निर्णय घेणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. 

Web Title: Sindhudurg's father of marine tourism Dr. Sarang Kulkarni resigned from the post of Water Tourism Advisor of MTDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.