Sindhudurg ZP Election Voting 2026: हृदयविकारावर रुग्णालयात तीन दिवसापासून उपचार, 'आयसीयू'मधून येऊन बजावला मतदानाचा हक्क
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 7, 2026 16:23 IST2026-02-07T16:20:58+5:302026-02-07T16:23:07+5:30
'अशा दक्ष मतदारांमुळेच आपली लोकशाही जिवंत'

Sindhudurg ZP Election Voting 2026: हृदयविकारावर रुग्णालयात तीन दिवसापासून उपचार, 'आयसीयू'मधून येऊन बजावला मतदानाचा हक्क
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज, शनिवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मतदानासाठी मतदान केंद्रावर नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. परुळे मतदान केंद्रावर माधवी दाभोलकर या नववधूने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावून लग्न मंडपात हजेरी लावली होती.
अशातच सर्जेकोट येथील ज्येष्ठ मच्छीमार दादा सावजी यांनी थेट रुग्णालयातून आयसीयूमधून येऊन सर्जेकोट येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या धैर्याबद्दल याठिकाणच्या मतदान केंद्र अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
दादा सावजी हे मालवणमधील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या निदानामुळे तीन दिवसापासून आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली. संबंधित डॉक्टर यांची परवानगी घेऊन दादा सावजी यांना मालवणमधून सर्जेकोट येथील मतदान केंद्रावर आणण्यात आले. तेथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आजारी असूनही थेट रुग्णालयातून येऊन मतदान करण्याचे धैर्य दाखवल्या बद्दल याठिकाणच्या मतदान केंद्र अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. सावजी यांनी आपल्या मतदान अधिकार कर्तव्य बद्दल दाखविलेल्या जागरूकतेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तालुका निवडणूक अधिकारी श्रीमती शारदा पवार यांनी अशा दक्ष मतदारांमुळे, ज्यांना आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव आहे त्यामुळेच आपली लोकशाही जिवंत आहे. तसेच खासकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के साक्षरता दर आहे तो अशा मतदारांमुळे सार्थकी ठरतो असे मत व्यक्त केले.