सिंधुदुर्ग : नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानची २६ पासून विश्वास यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:52 IST2018-11-17T11:49:52+5:302018-11-17T11:52:07+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सिंधुदुर्ग : नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानची २६ पासून विश्वास यात्रा
सिंधुदुर्गनगरी : महागाई वाढ, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेमध्ये असलेल्या पालकमंत्री, खासदार आमदार यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडाला आहे.
जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, जनतेला आधार देण्यासाठी तसेच विद्यमान सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याचा भकास कसा केला आहे हे पटवून देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सामंत म्हणाले की, गेली चार वर्षे राज्यात युती शासनाची सत्ता आहे. मात्र या कालावधीत महागाई वाढत आहे. शेतकºयांच्या समस्या जैसे थे आहेत. गॅसचे भाव वाढत आहेत. विज बिलांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. आणि या समस्या सोडविण्यास महाराष्ट्र सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे असा आरोपही दत्ता सामंत यांनी केला आहे.
त्याशिवाय सत्ताधाऱ्यांमध्ये असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा जिल्ह्याच्या प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. या सत्ताधाऱ्यांवर जनतेने टाकलेला विश्वास ते सार्थकी लावू शकलेले नाहीत.
त्यामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे जनतेला आधार देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आपल्या पक्षाचा विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याचा केलेला भकास जनतेला दाखविण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्यावतीने पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विश्वास यात्रा २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी निवडणूकीत स्वाभिमानचीच लाट : दत्ता सामंत
सत्तेत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी जनतेचा विश्वास घात केला आहे. त्यामुळे पक्षाच्या विश्वास यात्रेद्वारे जनतेमध्ये स्वाभिमान पक्षाचा विश्वास निर्माण केला जाणार आहे. आगामी निवडणुकीत स्वाभिमान पक्षाची लाट असणार असून जिल्ह्यातील तिन्ही आमदार व खासदार हा स्वाभिमान पक्षाच असणार असल्याचा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.