सिंधुदुर्ग : वर्षा पर्यटनाकडे पर्यटकांची पाठ, पर्यटन व्यावसायिक मात्र चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 17:14 IST2018-06-25T17:10:48+5:302018-06-25T17:14:49+5:30
जून महिना संपत आला तरी आंबोलीमध्ये म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे आंबोलीतील धबधबे अजूनही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले नाहीत. त्यामुळे येथील वर्षा पर्यटनाकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसले.

आंबोली येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला नाही.
सिंधुदुर्ग : जून महिना संपत आला तरी आंबोलीमध्ये म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे आंबोलीतील धबधबे अजूनही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले नाहीत. त्यामुळे येथील वर्षा पर्यटनाकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसले.
आंबोलीत जून महिन्यात साधारणत: ६० ते ६५ इंच पावसाची नोंद होते. पण हीच पावसाची नोंद यावर्षी केवळ २० इंच झाली आहे. त्यामुळे आंबोलीतील धबधबे अद्यापही प्रवाहित झालेले नाहीत. वास्तविक रविवार हा पर्यटकांनी हाऊसफुल्ल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, रविवारी आंबोलीत सामसूम होती.
कर्नाटक, कोल्हापूर येथील काही तुरळक पर्यटक वगळता आंबोलीत फारशी गर्दी नव्हती. पावसाने मारलेली दडी आणि पर्यटकांनी आंबोलीकडे फिरविलेली पाठ यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक मात्र चिंतेत पडले असून, येत्या काळात तरी चांगला पाऊस होऊन धबधबे सुरू होतील, अशी आशा करीत आहेत.