सिंधुदुर्ग : सौरकुंपणाचे काम रखडले, मळगाव ग्रामस्थ आक्रमक, वनक्षेत्रपालांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 16:01 IST2018-04-18T16:01:38+5:302018-04-18T16:01:38+5:30
वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता मळगाव गावासाठी मंजूर झालेले सौरकुंपणाचे काम वर्क आॅर्डर मिळूनही तीन महिने उलटले तरी सुरू करण्यात आले नसल्याने मंगळवारी मळगाव ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांची भेट घेतली. यावेळी काम तत्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तिक लाभ द्या, अशी मागणी केली.

सिंधुदुर्ग : सौरकुंपणाचे काम रखडले, मळगाव ग्रामस्थ आक्रमक, वनक्षेत्रपालांची घेतली भेट
सावंतवाडी : वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता मळगाव गावासाठी मंजूर झालेले सौरकुंपणाचे काम वर्क आॅर्डर मिळूनही तीन महिने उलटले तरी सुरू करण्यात आले नसल्याने मंगळवारी मळगाव ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांची भेट घेतली. यावेळी काम तत्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तिक लाभ द्या, अशी मागणी केली.
दरम्यान, सौरकुंपणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, हे काम चांगले दर्जेदार व्हावे, यासाठी ते रोखण्यात येऊन बंद केले होते. त्यानंतर चांगले काम करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे वनक्षेत्रपाल पाणपट्टे यांनी सांगितले.
तालुक्यात मळगाव गावासाठी पंचवीस लाखांचे सौरकुंपण जाहीर करण्यात आले आहे. ते वेत्ये-नेमळे या सीमेवर बसविण्यात येणार आहे. वर्कआॅर्डर काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. आता आणखी काही महिन्यांनी पुन्हा शेती सुरू होणार आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या, अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.
यावेळी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, संतोष सामंत, वनसमिती सदस्य मिलिंद पंत, अजित सातार्डेकर, बाबू मांगरकर, बाळा सातार्डेकर, महेश पंत, विजय नाईक, पंढरी नाईक, बाबल राणे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पाणपट्टे यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. सौरकुंपण घालणे गरजेचे आहे. सद्यस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणात गवे शेती-बागायतीत घुसून नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या पाठी लागण्याचा प्रकार वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पंढरीनाथ नाईक या शेतकऱ्यांचा गव्याने पाठलाग केला. सुदैवाने यात ते बचावले आहेत.
कामाची योग्य दखल घ्या
सौरकुंपणाचे काम घेऊन ठेकेदाराला तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सामान निकृ ष्ट दर्जाचे असल्याने आपणाकडून काम बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत त्याठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य टाकण्यात आले आहे.
त्याची योग्य दखल घ्या अन्यथा २५ लाख रूपये खर्च करूनही काहीच फायदा होणार नाही, असे सरपंच गणेश पेडणेकर यांनी सांगितले. सौरकुंपणाबाबत वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांच्याशी मळगाव ग्रामस्थांनी चर्चा केली.