समुद्री घोड्यांच्या संवर्धन, प्रजनन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:09 IST2025-01-10T19:08:36+5:302025-01-10T19:09:25+5:30
संदीप बोडवे मालवण: सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यां च्या अधिवासा बरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याकारणाने याठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन ...

समुद्री घोड्यांच्या संवर्धन, प्रजनन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गची निवड
संदीप बोडवे
मालवण: सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यां च्या अधिवासा बरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याकारणाने याठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्याच्यासाठी आवश्यक असणार्या अधिवासाच्या निर्मितीसाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’ पुढाकार घेतला आहे.
समुद्री घोड्यांच्या संख्येला आणि अधिवासाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘बीएनएचएस’ने सिंधुदुर्गामध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन प्रजनन प्रकल्प तयार करण्याचे ठरविले आहे. हा प्रकल्प सात कोटी रुपयांचा असून, यामाध्यमातून समुद्री घोड्यांचे प्रजनन आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणार्या अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात आचरा किंवा मिठमुंबरी या भागात संवर्धन प्रजनन केंद्र उभारण्याचा ‘बीएनएचएस’ने ठरविले आहे. या केंद्रासाठी ‘बीएनएचएसएन’ने आवश्यक असलेली जागा शोधण्याची आणि त्यासाठीच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.
भारतात समुद्री घोड्यांच्या अंदाजे सात प्रजाती
- ‘सी हॉर्स’ म्हणजेच समुद्री घोडा हा अस्थिमत्स्य वर्गातील एक मासा आहे. भारतात समुद्री घोड्याच्या अंदाजे सात प्रजाती सापडतात. त्यापैकी ‘हिम्पोकॅम्पस कुडा’ म्हणजेच ‘यलो स्पॉटेड सीहॉर्स’ ही एकमेव प्रजात महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आढळते. ही प्रजात कांदळवन, खाड्या, समुद्री गवतांचे प्रदेश, खडकाळ किनारे अशा काही अधिवासांमध्ये आढळते.
- या प्रजातींचा वापर मत्स्यपालन आणि चिनी औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याची तस्करी होते. भारत, थायलंड, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स हे समुद्री घोड्यांचे मुख्य निर्यातदार आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्रजातीचा व्यापार ५० हून अधिक राष्ट्रांमधून होतो. ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यां’तर्गत प्रथम श्रेणीत समुद्री घोडे संरक्षित आहेत.
सिंधुदुर्गात प्रामुख्याने समुद्री गवत आणि समुद्री शेवाळ सापडते. यापैकी सरगॅसम ही समुद्री शैवालाची प्रजाती तारकर्ली, वायरी व सिंधुदुर्गच्या अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळते. तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला समुद्री गवताचे काही भाग आहेत. सिंधुदुर्ग च्या समुद्रात सी हॉर्स चा अधिवास असणे हे येथील चांगल्या समुद्री पर्यावरणाचे द्योतक आहे. - सारंग कुलकर्णी, सागरी जीव संशोधक
सिंधुदुर्गच्या किनारी समुद्री भागात समुद्री घोड्यांसाठी पोषक परिस्थिती आहे. याठिकाणी तारकर्ली, देवबाग, दांडी, आचरा, कुणकेश्वर, मीठमुंबरी सह संपूर्ण किनारपट्टीवर अनेकदा पावसाळ्याच्या दिवसात मासेमारी जाळ्यात समुद्री घोडे सापडून येतात. मासेमारी जाळ्यात सापडलेले समुद्री घोडे पुन्हा समुद्रात सोडून दिले जातात - ऋतुज देऊलकर स्कुबा प्रशिक्षक