तारकर्ली स्कुबा डायव्हिंग केंद्राचे खासगीकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:45 IST2025-11-15T10:45:44+5:302025-11-15T10:45:59+5:30
Tarkarli Scuba Diving Center: भारतातील प्रमुख असलेल्या आणि महाराष्ट्राच्या जल पर्यटनाला दिशा दाखवणाऱ्या शासनाच्या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्राला (इसदा) तोट्यात दाखवून ते खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा डाव आखला जात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

तारकर्ली स्कुबा डायव्हिंग केंद्राचे खासगीकरण?
- संदीप बोडवे
मालवण - भारतातील प्रमुख असलेल्या आणि महाराष्ट्राच्या जल पर्यटनाला दिशा दाखवणाऱ्या शासनाच्या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्राला (इसदा) तोट्यात दाखवून ते खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा डाव आखला जात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. 'इसदा'च्या खासगीकरणामुळे स्थानिकांना तगडा प्रतिस्पर्धी निर्माण होणार असून, स्थानिकांचा जलपर्यटन व्यवसाय संकटात सापडण्याची भीती आहे.
स्थानिकांना स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी तारकर्लीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अॅण्ड अॅक्वाटिक स्पोर्टस् अर्थात 'इसदा'ची उभारणी केली. मालवणमध्ये ५०० हून अधिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांनी रोजगारनिर्मिती केली. तर तीन हजार लोकांना रोजगार मिळाला. 'इसदा'ने वायूसेनेच्या हजारो वैमानिकांना तसेच वन विभाग व स्थानिकांना प्रशिक्षण दिले.
५०० कोटींचे प्रकल्प 'इसदा'च्या जोरावर मंजूर
नाशिक, गोसीखुर्द, कोयनासारखे महाराष्ट्रातील सुमारे ५०० कोटींचे अनेक जलपर्यटन प्रकल्प एकट्या 'इसदा'च्या जोरावर मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाची सर्वदूर पर्यटन ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवताना 'इसदा'ने दीपस्तंभाची भूमिका बजावली आहे.
'आयएनएस गुलदार' आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सर्वेक्षण अहवाल 3 'इसदा'नेच बनवला. जल पर्यटनात प्रशिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संरक्षण करण्याच्या हेतूने 'इसदा'ची निर्मिती करण्यात आली. त्यामागे स्थानिकांना अल्प दरात जलपर्यटन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येणार होते. २०१५ मध्ये जेव्हा 'इसदा'ला अंतिम मंजुरी देण्यात आली, तेव्हा अनेक अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळाची राज्य शिक्षण संस्था म्हणून मंजुरी देण्यात आली. 3 सीआरझेडकडून मंजुरी देताना 'इसदा'चे खासगीकरण करण्यात येऊ नये तसेच 'इसदा'चे बिझनेस मोड्यूल तयार करु नये, अशा अटींचा त्यात समावेश आहे.
एकजूट दाखवावी
दोन वर्षापूर्वी तारकर्ली येथील 'इसदा'च्या डागडुजीसाठी साडेतीन कोटी मंजूर झाले होते. मात्र, हे काम रडतखडत सुरू आहे.
यामुळे जाणूनबुजून 'इसदा'ला तोट्यात ढकलण्याचा मोठा घोटाळा किंवा डाव आहे की काय ? असा संशय निर्माण झाला आहे.
दरम्यान, पर्यटन व्यावसायिक एकजूट दाखवून हा डाव हाणून पाडणार का? हे पाहणे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.