Sindhudurg: In the month of Malvan, the centenary celebration of the festival, announced by the corporation | सिंधुदुर्ग : मालवणात जानेवारीत शतक महोत्सवाची धूम, पालिकेकडून रूपरेषा जाहीर
सिंधुदुर्ग : मालवणात जानेवारीत शतक महोत्सवाची धूम, पालिकेकडून रूपरेषा जाहीर

ठळक मुद्देमालवणात जानेवारीत शतक महोत्सवाची धूम, पालिकेकडून रूपरेषा जाहीर सांगता समारंभासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, महेश कांदळगावकर यांची माहिती

सिंधुदुर्ग : मालवण नगरपरिषदेला यावर्षी शंभर वर्षे होत आहेत. यानिमित्त मालवण नगरपरिषद आणि आमदार वैभव नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने २५, २६, आणि २७ जानेवारी रोजी शतक महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय महोत्सवात सिनेस्टार, सेलिब्रिटी, नावाजलेले गायक यांच्यासह स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल अनुभवता येणार आहे. शतक महोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

मालवण नगरपरिषदेची स्थापना १९१८ साली करण्यात आली होती. २०१७ पासून शहरात पालिकेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविले गेले. शतक महोत्सवी वर्षाची सांगता २७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली तर आमदार वैभव नाईक यांनीही पाच लाखाचा निधी पालिकेला हस्तांतरित केला आहे.

यानिमित्त नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महोत्सवाची रूपरेषा जाहीर केली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, बांधकाम सभापती सेजल परब, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नितीन वाळके, पंकज साधये, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर आदी उपस्थित होते.

२५ रोजी महोत्सवाचा शुभारंभ केला जाणार आहे. २६ रोजी स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यासाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची जबाबदारी महिला नगरसेविकांवर देण्यात आली आहे.

शतक महोत्सवाची २७ जानेवारी सांगता होणार आहे. त्यानंतर पालिकेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात नगराध्यक्ष, नगरसेवक पद भूषविलेल्या आजी-माजी व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या शंभर वर्षांची यशोगाथेचे दर्शन घडविणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे, असे कांदळगावकर यांनी सांगितले.

भाजप नगरसेवकांची पाठ

शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या पत्रकार परिषदेत भाजप-शिवसेना युतीच्या गटात फूट असल्याचे प्रकर्षाने जाणवले. नगराध्यक्षांच्या साथीला शिवसेना नगरसेवक व विरोधी गटाचे दोन नगरसेवक होते. मात्र भाजपचे उपनगराध्यक्ष व गटनेते पालिकेत असताना पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. कांदळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले असतानाही भाजपच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. सेजल परब यांनी महोत्सवासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे, अशी भूमिका मांडली.

Web Title:  Sindhudurg: In the month of Malvan, the centenary celebration of the festival, announced by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.