सिंधुदुर्ग : माणुसकी, नैतिकतेच्या चौकटीतून खुर्चीला न्याय द्या : नीतेश राणे, वैभववाडी आमसभेत अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:49 IST2018-08-18T15:43:57+5:302018-08-18T15:49:09+5:30
जनतेच्या प्रश्नांना तांत्रिक उत्तरे देणे म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पर्यायाने लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यासारखे आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का? याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यादृष्टीने यापुढे पाऊल पडावे, अशी अपेक्षा आमदार नीतेश राणे यांनी आमसभेत व्यक्त केली.

सिंधुदुर्ग : माणुसकी, नैतिकतेच्या चौकटीतून खुर्चीला न्याय द्या : नीतेश राणे, वैभववाडी आमसभेत अपेक्षा
वैभववाडी : जनतेच्या प्रश्नांना तांत्रिक उत्तरे देणे म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पर्यायाने लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यासारखे आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का? याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यादृष्टीने यापुढे पाऊल पडावे, अशी अपेक्षा आमदार नीतेश राणे यांनी आमसभेत व्यक्त केली.
आमदार नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची आमसभा कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयाच्या सभागृहात झाली. सभेला तहसीलदार संतोष जाधव, सभापती लक्ष्मण रावराणे, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपसभापती हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, दुर्वा खानविलकर, अक्षता जैतापकर, नगराध्यक्षा दीपा गजोबार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, जिल्हा परिषद सदस्य, बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर आदी उपस्थित होते.
आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या पठडीतील उत्तरांमुळे जनतेचे प्रश्न सुटण्याची किंबहुना ते सोडविण्याची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे सभेचा समारोप करताना आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले. प्रश्न सुटावेत एवढीच जनतेची सभेला येण्यामागची अपेक्षा असते.
प्रत्येक ठिकाणी तांत्रिक मुद्दे पुढे करून चालणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्यासारखे करू शकत नाही. त्यामुळे मोठे प्रकल्प येतील तेव्हा येऊ दे. पण छोटे-छोटे प्रश्न सुटणे आवश्यक आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का? याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी करावा, असे आवाहन राणे यांनी केले.
पंचायत समितीची इमारत आहे त्या स्थितीत ताब्यात घेतली तर दोन महिने टिकणार नाही त्यामुळे वॉटरप्रुफींग झाल्याशिवाय इमारतीचे हस्तांतरण न करण्याची सूचना आमदार राणे यांनी कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांना केली. यावेळी नासीर काझी, भालचंद्र साठे, ए. एम. बोबडे, पुरुषोत्तम पाटील, रावजी यादव, महेश गोखले, उदय जैतापकर, सीमा नानिवडेकर, स्नेहलता चोरगे आदींनी प्रश्न मांडले.