सिंधुदुर्ग : नकारार्थी एनओसीमुळे बदलीपात्र तलाठी अस्वस्थ, डावखरे यांचे सचिवांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:41 IST2018-04-11T13:41:19+5:302018-04-11T13:41:19+5:30
मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्र अनेक तलाठ्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी नकारार्थी ना हरकत दाखला (एनओसी) दिल्यामुळे तलाठी वर्गात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली नकारार्थी एनओसी ग्राह्य न धरता पात्र तलाठ्यांच्या बदलीला मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी केली.

राज्यातील बदलीपात्र तलाठ्यांना नकारार्थी एनओसी ग्राह्य न धरण्याबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना निवेदन देताना कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे.
सिंधुदुर्गनगरी : मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्र अनेक तलाठ्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी नकारार्थी ना हरकत दाखला (एनओसी) दिल्यामुळे तलाठी वर्गात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली नकारार्थी एनओसी ग्राह्य न धरता पात्र तलाठ्यांच्या बदलीला मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून तलाठ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे तलाठ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हास्तरावरुन राज्य सरकारकडे सर्व अटी व शर्तींची पुर्तता करुन बदलीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले.
या प्रस्तावात काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना कार्यमुक्त करण्यात नकारार्थी भूमिका दर्शविली.
ज्या जिल्ह्यात रिक्त पदे आहेत, त्या जिल्ह्यात बदली हवी असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी आवश्यक असते.
सामान्यतः बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे. त्यातच मूळ जिल्ह्यात काम करण्याची तलाठ्यांची इच्छा असल्यास त्याला डावलणे चुकीचे आहे. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी बदलीसाठी पात्र तलाठ्यांना नकारार्थी एनओसी दिल्यामुळे सदर तलाठी बदलीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे, याकडे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी प्रधान सचिव श्रीवास्तव यांचे लक्ष वेधले.
कोकणातील मूळ रहिवाशी असलेले शेकडो तलाठी काही वर्षांपासून परजिल्ह्यात कार्यरत आहेत. या तलाठ्यांनाही नकारार्थी एनओसीचा फटका बसण्याची भीती आहे. या बदलीपात्र तलाठ्यांना दिलासा देण्याचा आग्रह आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी धरला.