सिंधुदुर्ग : करुळ घाटात साईडपट्टीला भेगा, लोरेत घराच्या छप्पराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:03 IST2018-06-12T17:03:03+5:302018-06-12T17:03:03+5:30
वैभववाडी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटाच्या मध्यावर नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यालगत साईडपट्टीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर भुईबावडा-तळीवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली आहे.

करुळ घाटात यंदा बांधकाम केलेल्या संरक्षक कठड्याजवळ साईडपट्टीला मोठ्या भेगा पडल्या आहेत.
सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटाच्या मध्यावर नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यालगत साईडपट्टीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर भुईबावडा-तळीवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली आहे. तसेच लोरे डोंगरेवाडीत घराच्या छप्पराचे नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी पडलेल्या पावसाची १२० मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे.
शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपून काढले होते. रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरला. परंतु, मुसळधार पावसामुळे करुळ घाटातील यंदा बांधलेल्या संरक्षक कठड्याजवळ साईडपट्टीला सुमारे २५-३० फूट लांब भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पावसाळ्यात रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घाटातील नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यांच्या बांधकामांची अशी स्थिती झाल्याने घाटातील कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भुईबावडा तळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याची दगडी बांधकाम असलेली सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोसळली आहे. त्या
मुळे भविष्यात तेथील जनतेची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीत झालेल्या वादळामुळे लोरे डोंगरेवाडी येथील लक्ष्मण तुकाराम डोंगरे यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाल्याने ३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.