सिंधुदुुर्ग :  करुळ घाटात छोटी दरड कोसळली, दीड तास एकेरी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:16 PM2018-06-11T14:16:56+5:302018-06-11T14:16:56+5:30

शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा करुळ घाटाला काही अंशी फटका बसला. मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळली. तर एके ठिकाणी मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

Sindhudurg: In the Karal Ghat, small rifts collapsed, one-and-a-half hour traffic | सिंधुदुुर्ग :  करुळ घाटात छोटी दरड कोसळली, दीड तास एकेरी वाहतूक

करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

googlenewsNext
ठळक मुद्देकरुळ घाटात छोटी दरड कोसळली, दीड तास एकेरी वाहतूक  भुईबावडा घाटात पाण्याचा प्रवाह रस्त्यावर; घाटमार्ग सुरळीत

सिंधुदुुर्ग : शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा करुळ घाटाला काही अंशी फटका बसला. मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळली. तर एके ठिकाणी मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

भुईबावडा घाटातील गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत होता. तालुक्यातील नद्यानाल्यांना पूर आला होता. त्यामुळे काही ठिकाणी पुराचे पाणी बागायतींमध्ये घुसले होते. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला.

शनिवारी दुपारनंतर तालुक्यात पावसाची रिपरिप वाढली होती. रात्री सव्वा एकच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळपासूनच नदीनाल्यांना पूर आला होता. रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळल्याने सुमारे दीड तास एकेरी वाहतूक सुरू होती.

त्याआधी एक भला मोठा दगड रस्त्यावर आला होता. मात्र तो रस्त्याच्या कडेला स्थिरावल्याने त्याचा वाहतुकीला फारसा अडथळा होत नव्हता. सार्वजनिक बांधकामच्या रस्ता कामगारांनी दरडीचे दगड बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

भुईबावडा घाटातील गटारे माती व पालापाचोळ्याने बंद झाली आहेत. त्यामुळे तुंबलेल्या गटारांच्या पाण्याचा मोठा प्रवाह दुपारपर्यंत रस्त्यावरुनच वाहत होता. त्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर तयार झालेला दगडमातीचा थर छोट्या वाहनांना त्रासदायक ठरत होता.

बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने तुंबलेल्या गटारांचा गाळ काढून रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह गटारात वळविला. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यानाल्यांच्या प्रवाहांची पातळी वाढलेली आहे.

धुक्यात सावधगिरी आवश्यक

तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे करुळ आणि भुईबावडा घाटात दरडींचा धोका वाढत आहे. त्यातच दोन्ही घाटांत रात्री दाट धुक्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना कसरत करून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे दुहेरी संकटाचा धोका असल्याने रात्रीच्या वेळी धुक्यातून प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
 

Web Title: Sindhudurg: In the Karal Ghat, small rifts collapsed, one-and-a-half hour traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.