सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांनी केसरकरांचीच ओढली री, गोव्यात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतूनच रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 17:02 IST2018-03-31T17:02:32+5:302018-03-31T17:02:32+5:30
गोवा सरकारने बांबुळीतील वैद्यकीय महाविद्यालयातील मोफत सेवा बंद केल्यानंतर गेला आठवडाभर सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोशच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी : गोवा सरकारने बांबुळीतील वैद्यकीय महाविद्यालयातील मोफत सेवा बंद केल्यानंतर गेला आठवडाभर सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोशच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मात्र मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांचीच री ओढत महात्मा फुले आरोग्यदायी योजना गोव्याच्या मेडिकल कॉलेजला देण्याचे सुतोवाच केले आहे. तसेच या बैठकीत त्यावर एकमतही घडवून आणण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील रुग्णांना गोव्यात मोफत रुग्णसेवा देण्यात यावी या मागणीसाठी दोडामार्ग, सावंतवाडी तसेच कुडाळ येथे सर्वपक्षीयांचे जनआक्रोश आंदोलन सुरू आहे. दोडामार्गमधील आंदोलनाने तर उग्र रुप धारण केले आहे. त्यामुळे यावर तातडीने तोडगा निघाला पाहिजे यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर हे आपल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना यश येत नाही.
आठवड्यापूर्वी राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांची भेट घेतली व गोवा सरकारला वर्षाला दोन कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसेच महात्मा फुले आरोग्यदायी योजनाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. पण जनआक्रोश समिती हे ऐकण्यास तयार नव्हती. ते मोफत रुग्णसेवा द्या अशी मागणी घेऊन बसले होते. त्यांनी गेले आठवडाभर आंदोलनही सुरू ठेवले आहे.
दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आदेशानंतर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्गमधील रुग्णांना मोफत रुग्णसेवा द्या. तुम्हांला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून होणारा खर्च देण्यात येईल, असे सांगितले. तसेच याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार, असेही सांगितले. गोव्याचे आरोग्यमंत्री राणे यांनीही याला होकार देत पुन्हा रुग्णसेवा देण्याचे मान्य केले आहे.
मंत्री दीपक केसरकर यांनीही गोव्यातील आरोग्यसेवा बंद केल्यानंतर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून गोव्याला पैसे देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही आता मंत्री दीपक केसरकर यांचीच री ओढत यावर एकमत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे गोव्याची वार्षिक ५ कोटी देण्याची अटही आता मागे पडली आहे.