Sindhudurg: भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 21:27 IST2022-08-12T21:27:12+5:302022-08-12T21:27:33+5:30
Sindhudurg: मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याच्या काम जेसीबीच्या साहाय्याने सुरु केले आहे.

Sindhudurg: भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग - मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याच्या काम जेसीबीच्या साहाय्याने सुरु केले आहे.
तालुक्यात मागील काही दिवस पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून सह्याद्री पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गगनबावडा परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गगनबावड्यातून दीड किलोमीटर अंतरावर भुईबावडा घाटात दरड कोसळली.
दगड मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने १०० ते १५० फूट लांब रस्ता व्यापला आहे. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भुईबावडा घाट रस्त्यात असलेल्या अनेक वाहनांना माघारी परतावे लागले. घाट रस्त्यातून वाहने मागे घेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली.
वाहनधारकांचे हाल
सार्वजनिक बांधकाम विभागाला दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरूवात केली आहे. दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असले तरी दरड हटविण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. भुईबावडा घाट रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनचालक पुन्हा अडचणीत आले आहेत. सध्या करुळ घाटमार्गे अवजड वाहने वगळून वाहतुक सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतुक फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.