सिंधुदुर्गात कमळ फुलणार, जिल्हा परिषद, बँक येणार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:28 PM2019-08-30T13:28:40+5:302019-08-30T13:31:14+5:30

स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार असलेल्या नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या विरोधामुळे लटकलेला राणेंचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला आहे. राणेंसमवेत त्यांचे सुपूत्र निलेश आणि नितेश हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

 In Sindhudurg all the power lotus will flourish, including Zilla Parishad, Zilla Bank | सिंधुदुर्गात कमळ फुलणार, जिल्हा परिषद, बँक येणार ताब्यात

सिंधुदुर्गात कमळ फुलणार, जिल्हा परिषद, बँक येणार ताब्यात

Next
ठळक मुद्दे सिंधुदुर्गात सर्वच सत्तास्थानी कमळ फुलणार, जिल्हा परिषद, बँक येणार ताब्यात जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ८0 टक्के सत्तास्थाने भाजपकडे

महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग : स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार असलेल्या नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या विरोधामुळे लटकलेला राणेंचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला आहे. राणेंसमवेत त्यांचे सुपूत्र निलेश आणि नितेश हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे त्यांचे होमपिच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मात्र कमालिची उलथापालथ होणार असून जिल्ह्यात सर्वत्र कमळ फुलणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह, जिल्हा बँक, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतींमध्ये ८0 टक्के सत्तास्थानी कमळ फुलणार असल्याने सिंधुदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला अच्छे दिन येणार आहेत.

स्वाभिमान पक्षाच्या ताब्यात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तसेच केवळ कुडाळ पंचायत समिती वगळता मालवण, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, देवगड, वेंगुर्ला आणि दोडामार्ग अशा सातही पंचायत समित्यांवर भाजपाची सत्ता येणार आहे.

शिवसेनेकडून माजी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेल्या नारायण राणे यांनी २00५ सेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर १३ वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये त्यांना महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी महत्वाची पदेही मिळाली होती. मात्र, २0१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने नारायण राणे नाराज होते.

२0१४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील वांद्रे मतदार संघातील पोटनिवडणुकीतही राणे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मात्र, त्यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती. मात्र, वर्षभरात राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली होती.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राणे भाजपाच्या संपर्कात होते. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनीही राणेंच्या प्रवेशाला हिरवा कंदिल दिला होता. मात्र, याच दरम्यान, राणे यांच्या भाजपा प्रवेशाला भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कडवा विरोध केला होता. त्यामुळे भाजप आणि स्वत: राणे हतबल होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सेनेला बरोबर घेण्यासाठी भाजपाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राणेंच्या प्रवेशाबाबत सर्वसमावेशक तोडगा काढून त्यांना स्वतंत्र स्वाभिमान पक्ष स्थापन करण्यास सांगितले होते. त्यानंतर राणेंनी स्वतंत्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. स्वाभिमान पक्ष स्थापल्यानंतर तो पक्ष एनडीए सरकारमध्ये सामिल होता. त्यामुळे भाजपाने नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लावली होती.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राणे जरी राज्यसभा सदस्य असले तरी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात युतीचे लोकसभेसाठीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरोधात आपले सुपूत्र निलेश राणे यांना निवडणुकीत उतरविले होते. निलेश राणेंचा राऊत यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने पराभवही झाला. मात्र, राणेंचे सुपूत्र निवडणूक रिंगणात असतानाही भाजपाने त्यांच्यावर कोणतीही सक्ती केलेली नाही.

युतीमध्येच होणार राजकीय लढाई

नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश झाल्यानंतर भाजपमधील काही नेतेमंडळी ज्यांचा नारायण राणेंना कायमच विरोध राहिला आहे, ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात भाजप आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांमध्येच राजकीय लढाई होणार आहे. विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या सर्व पक्षांची ताकद तेवढी मोठी नाही. त्यामुळे खरी लढाई सध्याच्या सत्ताधारी असलेल्या युतीमध्ये रंगणार आहे.

जिल्हा परिषदेसह, जिल्हा बँक भाजपाच्या ताब्यात

नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश झाल्यास राणे समर्थक किवा स्वाभिमान पक्षाचे वर्चस्व असलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजपामय होणार आहे. आताच्या जिल्हा परिषदेत ५0 पैकी २८ सदस्य स्वाभिमानकडे आहेत. तर १६ शिवसेना आणि ६ भाजपाकडे आहेत. जिल्हा बँकही पूर्णपणे राणेंच्या ताब्यात आहे.

भाजपाची स्वबळाची तयारी

शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा भाजपाप्रवेश लांबला होता. आता भाजपमध्ये इतर पक्षातून येणाऱ्या विद्यमान आमदारांची संख्या वाढल्याने या आमदारांना तिकीट देण्यासाठी भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

कोकणात भाजपाची ताकद वाढणार

कोकणात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी नारायण राणेंना भाजपाने पक्षप्रवेश दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी शिवसेनेचा विरोधही डावलण्यात आला आहे. राणे आणि इतर आमदारांच्या प्रवेशामुळे भाजप येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी वाढवणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. राणे भाजपामध्ये प्रवेश करतानाच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार आहेत. राणेंसोबत त्यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार निलेश राणेही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Web Title:  In Sindhudurg all the power lotus will flourish, including Zilla Parishad, Zilla Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.