चाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:12 IST2020-06-03T16:08:57+5:302020-06-03T16:12:33+5:30
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

चाकरमान्यांसाठी सिंधुआत्मनिर्भर अभियान : अतुल काळसेकर
कणकवली : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आत्मनिर्भर अभियानासाठी समन्वय समिती गठीत केलेली आहे. अनेक अनुभवी आणि सेवाव्रती मार्गदर्शकांच्या मदतीने या अभियानाचे नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यात गावाकडे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमानी मंडळींची गुगल अर्जाच्या सहाय्याने माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. या गुगल अर्जाची लिंक संबंधितांना पाठविण्यात आली असून इच्छुकांनी अर्ज भरून पाठवावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कोरोना आपत्तीच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाच्या दोन संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातले एक आहे आरोग्य आणि दुसरे आहे ते आर्थिक संकट. या दोन्ही संकटांच्या अनुषंगाने आपली अनेक चाकरमानी मंडळी आपापल्या गावी परतलेली आहेत.
भविष्यात मुंबईतील परिस्थिती काय वळण घेईल ते आज सांगणे अवघड आहे. पण अशाही परिस्थितीत ज्यांना मुंबई किंवा शहर सोडणे शक्य होणार नाही अशी मंडळी ही परिस्थिती आटोक्यात आल्यावर माघारी फिरतील.
अशा चाकरमानी बांधवांसमोर अनेक आव्हाने आहेत. मग ती कौटुंबीक, सामाजिक असतील किंवा नोकरी व्यवसायाबाबत. त्यामुळे समस्त समाजाने त्यांच्यासोबत राहिले पाहिजे. जिल्हाभर ही एक चळवळ झाली पाहिजे. हे एक अभियान झाले पाहिजे.
याचीच एक सुरुवात म्हणून सिंधु आत्मनिर्भर अभियानच्या माध्यमातून आम्ही अशा २० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची गुगल अर्जाद्वारे माहिती गोळा करीत आहोत. या माहितीच्या आधाराने नोकरीसाठी इच्छुक आणि व्यवसायासाठी इच्छुक असे वर्गीकरण करता येईल. त्यात नोकरीसाठीचे कौशल्य आणि व्यवसायासाठीचे आवडीचे क्षेत्र लक्षात येईल.
सध्याचा आर्थिक स्तर व अपेक्षा लक्षात येतील. त्या अनुषंगाने त्यांना योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास, प्रशिक्षण, विविध सरकारी योजना आणि बँकामार्फत आर्थिक साहाय्य अशा बाबी उपलब्ध करून देणे सोयीचे होईल. यासाठी भारतीय जनता पार्टी व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त मुंबईकर मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही काळसेकर यांनी केले.