गाडल्या गेलेल्या शिवकालीन तोफेने घेतला मोकळा श्वास, मालवण बंदर जेटीवरील आवारात होती जमिनीखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:03 IST2025-05-27T17:03:01+5:302025-05-27T17:03:27+5:30
मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता दुर्गसंवर्धन चळवळीचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पंधरा शिलेदारांनी तोफ बाहेर काढली

गाडल्या गेलेल्या शिवकालीन तोफेने घेतला मोकळा श्वास, मालवण बंदर जेटीवरील आवारात होती जमिनीखाली
मालवण : ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता दुर्गसंवर्धन चळवळीचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पंधरा शिलेदारांनी मालवण बंदर जेटीवरील कस्टम कार्यालयाच्या आवारात असलेल्या आणि वर्षोनुवर्षे सुमारे चार फूट जमिनीखाली अर्धवट उलटी करून गाडल्या गेलेल्या शिवकालीन तोफेला शुक्रवारी मोकळा श्वास दिला.
याबाबत संस्थेचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुण्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मालवण बंदर जेटीवर असणाऱ्या कस्टम कार्यालयाच्या प्रांगणात कित्येक वर्षे एक शिवकालीन तोफ जमिनीत उलटी करून अर्धवट गाडलेल्या अवस्थेत होती. सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि इतिहास अभ्यासक गणेश रघुवीर हे २०१९ साली मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गला आले होते. त्यावेळी मालवण बंदर जेटीवरील कस्टम ऑफीसच्या आवारात असलेली उलट्या अवस्थेत जमिनीत गाडली गेलेली उभी शिवकालीन तोफ निदर्शनास आली.
त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या आपल्या शिलेदारांच्या कानी ही गोष्ट घातल्यानंतर या तोफेला जमिनीतून बाहेर काढण्याचे ठरले आणि सन २०१९पासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्गने हालचाली सुरू करून कस्टम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पत्रव्यवहार सुरू केला. अखेर या प्रयत्नांना यश आल्याने २३ मे २०२५ रोजी ही तोफ बाहेर काढण्याचे ठरले.
शुक्रवारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्गचे अध्यक्ष - सुनील राऊळ, उपाध्यक्ष - रामचंद्र आईर, तसेच शिलेदार एकनाथ गुरव, कार्तिक गोसावी, साहिल आईर, ओमप्रकाश नाईक, मंदार सावंत, बंटी आईर, अश्विन गाड, दिनेश आंगणे, प्रज्वल कोयंडे, मनीष गावडे, यशराज कोयंडे, ओजस परब, उमेश खडपकर, गजानन दळवी हे सकाळी नऊ वाजता जमा झाल्यानंतर साकडे घालण्यात आले. सुमारे आठ तासांनंतर जमिनीत अर्धवट अवस्थेत पुरण्यात आलेली ही तोफ बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
वर्षानुवर्षे गाडलेल्या स्थितीत
तोफेच्या बाजूलाच छोटेखानी देवालय असून, त्याठिकाणी पूजा अर्चा होत असे. मात्र, इतिहास साक्षी असलेली ही तोफ वर्षानुवर्षे गाडलेल्या स्थितीत असल्याने ती सर्वांसमोर यावी, तोफेचे योग्य संवर्धन व्हावे, या हेतूने दुर्ग संवर्धनाचे कार्य करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेकडून ही तोफ कठडा व जमिनीतून बाहेर काढण्यात आली.
संवर्धन करण्यात येणार
यासाठी कस्टम विभाग, मालवण आणि मेरीटाइम बोर्ड (बंदर विभाग) मालवण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बाहेर काढलेली ही तोफ ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग अथवा किल्ले राजकोट याठिकाणी ठेवून तिचे संवर्धन करण्यात येणार आहे.