शिवसेना घोषणा नाही तर अंमलबजावणीही करते : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:25 IST2020-05-05T16:23:39+5:302020-05-05T16:25:08+5:30
सावंतवाडी : कोरोनाच्या संकटात दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना ठाम राहिली आहे. भविष्यात तुमच्याकडे अनेकजण येतील. आश्वासने देतील. पण घोषणा ...

दशावतार नाट्यमंडळांना शिवसेनेच्यावतीने मदतीचा हात देण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत, अशोक दळवी, रुपेश राऊळ, विक्रांत सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी : कोरोनाच्या संकटात दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना ठाम राहिली आहे. भविष्यात तुमच्याकडे अनेकजण येतील. आश्वासने देतील. पण घोषणा करणाऱ्यांच्या पाठीशी रहायचे की अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मागे रहायचे हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांंनी दशावतारी कलाकारांना केले.
पालकमंत्री सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सावंतवाडी परिसरातील ४० दशावतार मंडळांना धनादेशांचे वाटप केले. हा कार्यक्रम येथील आरपीडी हायस्कूलमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत, शहरप्रमुख नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अपर्णा कोठावळे, अशोक दळवी, राजन पोकळे, नारायण राणे, योगेश नाईक, सागर नाणोसकर, अमेय तेंडोलकर आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, हे कलाकार कोरोनाच्या काळात स्वत:ला सावरून पुढील काळात उत्स्फूर्तपणे कला सादर करतील अशी खात्री शिवसेनेला आहे. त्यामुळे कलाकारांना शिवसेना हात देत आहे. शिवसेना कायमच कलाकारांसोबत राहिली आहे. खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक या सर्वांनी ठरविल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून कलावंतांना मदतीचा विचार पुढे आला. शासनाची मदत कलाकरांना मिळेल पण या मदतीपेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आर्थिक संकटात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा एक असतानाचे आमचे गणेश मंडळ आहे. या गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी दशावतारी कलाकारांच्या मंडळांना मदत देण्यासाठी माझ्याकडे पाच लाख रुपयांची रक्कम दिली आहे. त्यातूनच मी दशावतारी नाट्यमंडळांना ही मदत वितरित करीत आहे.
दशावतारी कलाकारांच्या मदतीसाठी यापुढेही शिवसेना उभी राहील. आता कलाकारांनी या संकटानंतर पुन्हा उभे राहून उत्स्फूर्तपणे कला सादर करावी. शिवसेना तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दशावतारी कलाकारांसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कॅश क्रेडीट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सामंत यांनी केले.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, दिवसा डोक्यावर बोजा आणि रात्रीचा राजा अशी अवस्था दशावतारी कलावंतांची असते. त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दशावतारी कलाकारांच्या पाठीशी कायमच शिवसेना उभी राहील, असे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ४० दशावतारी नाट्यमंडळांच्या अध्यक्षांना पाच लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, नारायण राणे, अपर्णा कोठावळे यांच्या हस्तेही धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी दशावतार मंडळाच्या कलाकारांचे स्वागत विक्रांत सावंत यांनी केले तर आभार रुपेश राऊळ यांनी मानले.
शिवसेना कायमच गरिबांच्या पाठीशी
आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला नगरपरिषद-नगरपंचायतींसाठी आमदार निधीतून अठरा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीदेखील झाली असल्याचे सामंत म्हणाले. शिवसेना कायमच गोरगरिबांच्या मदतीसाठी धावते. त्यामुळेच घोषणाबाजी करणाºयांसोबत की प्रामाणिकपणे मदत करणाºयांसोबत तुम्ही राहणार आहात ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन कलाकारांना यावेळी त्यांनी केले.