मच्छिमारांमधील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:38 IST2018-08-26T16:19:17+5:302018-08-26T16:38:36+5:30
कोकणातील शिवसेना आमदारांचा पर्ससीन व प्रकाशझोतातील मासेमारीला ठाम विरोध आहे.

मच्छिमारांमधील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील!
मालवण : कोकणातील शिवसेना आमदारांचा पर्ससीन व प्रकाशझोतातील मासेमारीला ठाम विरोध आहे. त्यामुळेच सरकारने प्रकाशझोतातील मासेमारीवर बंदीचा निर्णय घेतला. पर्ससीन व एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे. अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी व मच्छिमारांमधील संघर्ष टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधत पर्ससीनबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. शासनाकडून पर्ससीन मासेमारीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी शिवसेना कायमच आग्रही राहिली आहे. मत्स्य हंगाम कालावधीत पर्ससीन-एलईडी मासेमारीवर पूर्णत: बंदी आणण्याचे शासनाचे धोरण असून त्याअनुषंगाने मत्स्य व्यवसाय मंत्र्यांशी मुंबईत चर्चा झाली आहे. यात गस्तीनौकेची निविदा तीन वर्षांसाठी घेण्याचे मान्य केले आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले.
मत्स्य विभागाचे अधिकार वाढविणार
अनधिकृत मासेमारी नौकांवर मत्स्य विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबतचे सर्व अधिकार तहसीलदारांकडे असतात.
मात्र, कारवाई केलेल्या नौकांवर दंडाचे अधिकार मत्स्य विभागाला देण्याबाबत मासेमारी अधिनियम कायद्यात बदल करण्याची मागणी आपण केली असून शासनाने त्यास अनुकूलता दर्शविली आहे. यावर हिवाळी अधिवेशनात निर्णय होईल, असे आमदार नाईक यांनी सांगितले.