दीपक केसरकर म्हणजे ‘खाली मुंडी अन् पाताळ धुंडी’, अरूण दुधवडकर यांची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:02 IST2022-06-27T17:01:26+5:302022-06-27T17:02:22+5:30
गुरू पौर्णिमेला पक्षात आले आणि मरेपर्यंत शिवसेनेत राहीन हे वचन दिले होते. पण आता कदाचित आत्मा बनून शिवसेनेवर टीका करत आहेत का?, अरुण दुधवडकर यांचा सवाल.

दीपक केसरकर म्हणजे ‘खाली मुंडी अन् पाताळ धुंडी’, अरूण दुधवडकर यांची खरमरीत टीका
सावंतवाडी : "आमदार दीपक केसरकर म्हणजे ‘खाली मुंडी अन् पाताळ धुंडी’ अशी व्यक्ती आहेत. गुरू पौर्णिमेला पक्षात आले आणि मरेपर्यंत शिवसेनेत राहीन हे वचन दिले होते. पण आता कदाचित आत्मा बनून शिवसेनेवर टीका करत आहेत का?," असा सवाल शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी केली आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर,अतुल रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, जानवी सावंत, जिल्हा बँक संचालक विद्या परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, यशवंत परब, विक्रांत सावंत, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार उपस्थित होते. "केसरकर ज्या दिवशी शिवसेना सोडून गेले, त्या दिवसापासून आम्हाला नकोशे झाले होते. आपल्याला विकास काम करायला मिळाले नाही, अशी टिमकी वाजवणार्या केसरकरांनी मंत्रीपद असताना सगळे बाबा आणि मंदिरे फिरण्याचे काम केले. नाहक टीका करण्यापेक्षा त्या काळात तुम्ही विकास का करू शकला नाही? याचे उत्तर द्यावे," असे त्यांनी सांगितले.
"शिवसेना पक्षाने केसरकरांना मान सन्मान दिला, मंत्रीपद दिले. मात्र आज ते शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेना नेत्यांवर टीका करीत आहेत. मात्र काही झाले तरी येथील शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही. ते कुठेही गेले तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत," असा दावा त्यांनी केला. तसेच शिवसेनेतून बाहेर पडून जाणार्या सर्व आमदारांच्या विरोधात त्यांनी कोकणच्या देवांना साकडे घालत असल्याचे त्यांनी सांगितले.