सिंधुदुर्गमधील शिवसैनिक देतायत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र!, ५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 17:15 IST2022-07-22T17:14:47+5:302022-07-22T17:15:54+5:30
शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे यापूर्वी जिल्ह्याने पाहिले आहे.

सिंधुदुर्गमधील शिवसैनिक देतायत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र!, ५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून ५० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याबाबतची प्रतिज्ञापत्र देखील घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे आज, शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम आहेत. सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे यापूर्वी जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेसोबतच आहेत. त्याबाबतची प्रतिज्ञापत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो पदाधिकारी व शिवसैनिक देत आहेत.
येत्या काळात शिवसेनेची ताकद युवा सेना, महिला आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही अजून वाढवणार आहोत. जिल्ह्यात ५० हजार नवीन सदस्य नोंदणी देखील करण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना समन्वयक राजू राठोड, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, रिमेश चव्हाण, विकास लाड, राजू डोंगरे आदी उपस्थित होते.