शिक्षणासाठी तिने घेतला डोंगराचा आधार : स्वप्नाली सुतारला व्हायचंय पशुवैद्यकीय अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 03:34 IST2020-08-21T03:33:37+5:302020-08-21T03:34:08+5:30
मात्र, गावात रेंज नव्हती. पण, ध्येयाने पछाडलेली स्वप्नाली गप्प बसली नाही.

शिक्षणासाठी तिने घेतला डोंगराचा आधार : स्वप्नाली सुतारला व्हायचंय पशुवैद्यकीय अधिकारी
मिलिंद डोंगर
कनेडी (कणकवली) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील युवती गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या डोंगरावर भर पावसात झोपडीत बसून दिवसभर अभ्यास करते. तिची तळमळ पाहून आमदार नीतेश राणे यांनी तिच्या वसतिगृहाचा खर्च उचलण्याची हमी दिली आहे.
स्वप्नाली सुतार असे तिचे नाव असून ती दारिस्ते (ता. कणकवली) येथील रहिवासी आहे. ती मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकते. लॉकडाऊनमध्ये ती गावी अडकली. त्यानंतर तिचे आॅनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र, गावात रेंज नव्हती. पण, ध्येयाने पछाडलेली स्वप्नाली गप्प बसली नाही.
भावाचा मोबाईल घेऊन रानावनात इंटरनेटसाठी फिरू लागली. घरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात तिला पुरेसे इंटरनेट मिळू लागले. सध्या ही झोपडीच तिचे कॉलेज बनले आहे.
>असा असतो स्वप्नालीचा
दिनक्रम.....
९ ते १२.३० वाजेपर्यंत लेक्चरला हजेरी लावते. त्यानंतर १.३० ते ६ या वेळेत प्रॅक्टिकल होते. साडेसहा वाजता सर्व आटोपून घरी परतते, असे तिने सांगितले.
तिला मदतीची गरज नाही. पण तिला मुंबईत वसतिगृहासाठी सहकार्य करावे, अशी कुटुंबियांचीअपेक्षा आहे. सुरुवातीच्या दिवसांत १५ ते २० दिवस मी पावसात छत्री पकडून उभी राहून लेक्चरला हजेरी लावली. त्यानंतर घरच्यानीही पाठिंबा दिला, असे तिने सांगितले.
माझ्या भावांनी डोंगरावर एक छोटीशी झोपडी तयार केली. त्याच झोपडीत मी अभ्यासाला सुरुवात केली. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अभ्यास करते, असेही ती म्हणाली.