Sindhudurg: खारेपाटण येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने होणार सर्व्हिस रस्ता
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 25, 2025 17:15 IST2025-03-25T17:14:32+5:302025-03-25T17:15:51+5:30
महामार्गालगत असलेल्या विद्युत, जल वाहिन्यांचे होणार स्थलांतर

Sindhudurg: खारेपाटण येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने होणार सर्व्हिस रस्ता
संतोष पाटणकर
खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण या गावात महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूने अत्यावश्यक असणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम भूसंपादन करण्यात आले असताना देखील अपूर्ण ठेवण्यात आले होते. आता मात्र या अपूर्ण असलेल्या सर्व्हिस रोड चे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित संभाव्य सर्व्हिस रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाचे प्रतिनिधी जाधव, महाराष्ट्र राज्य विद्युत विभगाचे खोत, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग खारेपाटण उपविभागिय कार्यालयाचे अभियंता बी. जी. कुमावत, खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जि.सी. वेंगुर्लेकर आदी प्रमुख पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
खारेपाटण येथील मुंबई - राष्ट्रीय महामर्गावरील बांधकाम विभागाचे कार्यालय ते खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन रोड ब्रीजपर्यंत ते पुढे मधुबन हॉटेल ते संभाजीनगर बस स्टॉप पर्यंत सर्व्हिस रस्त्याचे काम करण्यात येणार असून खारेपाटण पीक अप शेडवरचे स्टँड बस थांबा ते संभाजीनगर गुरववाडी खारेपाटण येथेपर्यंत सर्व्हिस रस्ता होणार आहे. या कामामध्ये बाधित होणाऱ्या जल व विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात येणार असून त्याचे अंदाजत्रक तयार करून संबंधित खात्यांना पाठविण्यात येणार आहे.
यापूर्वीच भूसंपादन, नवीन भूसंपादन नाही
सुमारे २ किलो मिटर लांब व साडे पाच फूट रुंद असा महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे. तर खारेपाटण येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने होणाऱ्या या सर्व्हिस रोड करीता महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने या पूर्वीच भू संपादन करण्यात आलेले असून नव्याने भू संपादन करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. तर या सर्व्हिस रोड मुळे खारेपाटण महामार्गावरील होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.