Servants will have a health check-up | येणाऱ्या चाकरमान्यांची आंबोली बस स्थानकावर आरोग्य तपासणी

आंंबोली पोलिस तपासणी नाका बसस्थानक परिसरात हलविण्यात आला आहे.

ठळक मुद्देआंबोली पोलीस तपासणी नाका बस स्थानकावरखबरदारीचा उपाय म्हणून चौवीस तास पथकही राहणार कार्यरत

आंबोली : कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सव काळात सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या नोंदी जिल्ह्याच्या हद्दीवर ठेवण्यासाठी आंबोली पोलीस तपासणी नाक्याजवळ असलेले तपासणी पथक आता आंबोली बस स्थानकावर हलविण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात पुणे, मुंबई, कोल्हापूर तसेच कर्नाटक, गुजरात या भागातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. सिंधुदुर्गात येण्यासाठी चाकरमानी पुणे, कोल्हापूर, आंबोलीमार्गे सिंधुदुर्ग या रस्त्याला जास्त पसंती दिली जात आहे.

मुंबई-पुणे येथून येणाऱ्या लोकांच्या वाहनांची गर्दी व स्थानिकांना त्यापासून कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून हे तपासणी नाके आंबोली बसस्थानकावर हलविण्यात आले आहे. याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा असून तपासणी करणेही सोपे जाणार आहे.

या तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक, सह पोलीस कर्मचारी उपस्थित असणार आहेत. आंबोलीमार्गे सिंधुदुर्गात येण्यासाठी या तपासणी नाक्यावर आपल्या नोंदी करूनच व सर्दी खोकला ताप अशी काही लक्षणे असल्यास त्याचे कडक आरोग्य तपासणी करून, ई पासच्या तपासणी नंतरच सिंधुदुर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

आंबोली बाजारपेठ आजपासून महिनाभर राहणार बंद

१ ते ३१ आॅगस्टपर्यात आंबोलीमध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायत आंबोलीतर्फे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. आंबोलीमार्गे बरेच मुंबई पुणेकर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. चाकरमान्यांसाठी हा मुख्य मार्ग आहे.

यावेळी येथील चहा टपरी, छोटी मोठी भोजनालय, निवास व्यवस्थेची हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंबोली हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून येथील रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणेकर गणेशोत्सवानिमित्त दाखल होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने आंबोली बंद असल्याचे घोषित केले आहे.

 

Web Title: Servants will have a health check-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.