महोत्सवातून सावंतवाडीची ओळख
By Admin | Updated: December 29, 2014 00:08 IST2014-12-28T22:48:07+5:302014-12-29T00:08:18+5:30
खेमसावंत भोसले : सावंतवाडीतील पर्यटन महोत्सव कार्यक्रमांचा शुभारंभ

महोत्सवातून सावंतवाडीची ओळख
सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची चाहूल लागताच नवनवीन पर्यटक सावंतवाडीत येत असतात. या पर्यटकांना या महोत्सवाच्या माध्यमातून सावंतवाडीची ओळख होते. यामुळे असे उपक्रम सुरू ठेवावेत, असे प्रतिपादन श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी केले. यावेळी राजेसाहेब खेमसावंत यांनी महोत्सवाच्या चौथ्या दिवशीचा शुभारंभ करीत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मेलोडिज फॉरेव्हर या आॅर्केस्ट्राचीही मजा रसिकांनी घेतली.
यावेळी श्रीमंत शुभदादेवी भोसले, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पल्लवी केसरकर, विलास जाधव, सुदन्वा आरेकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, देवेंद्र टेमकर, शुभांगी सुकी, साक्षी कुडतरकर, अफरोज राजगुरू, संजय पेडणेकर, किर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, अनारोजीन लोबो, क्षिप्रा सावंत, अॅड. सुभाष पणदूरकर आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तरंगत्या शोभायात्रेमध्ये प्रथम क्रमांक महिषासूरमर्दिनी माऊली कलामंच, द्वितीय पारंपरिक होलीचा उत्सव आरवली-वेंगुर्ले यांनी, तर तृतीय क्रमांक खासकीलवाडा संघाच्या ‘राम वनवास दर्शन’ या देखाव्याने मिळविला.
या सर्वांना राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच मिनी पर्यटन महोत्सवात विविध स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या बालकलाकारांसह खुल्या गटातील विजेत्यांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच यावेळी नगरपालिकेच्या आरोग्य सभापती देवेंद्र टेमकर, पाणीपुरवठा सभापती शर्वरी धारगळकर, महिला बालविकास सभापती वैशाली पटेकर यांची निवड झाल्याबद्दल राजेसाहेब खेमसावंत व श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. (वार्ताहर)
रसिक मंत्रमुग्ध
सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी इंडियन म्युझिक अॅकेडमी, सांगली प्रस्तुत ‘मेलोडिज फॉर एव्हर’ आॅर्केस्ट्रा सादर करण्यात आला. या बहारदार अशा आॅर्केस्ट्रामध्ये नवनवीन गाण्यांच्या सुरांमध्ये उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पर्यटन महोत्सवातील व्यासपीठ आॅर्केस्ट्रातील ४० तरुण कलाकारांनी फुलून गेले होते. या कलाकारांनी जुन्या नवीन गीतांचा नजराणा सावंतवाडीवासियांना बहाल केला.